
कोल्हापूर ः कोल्हापूरच्या संदेश दत्तात्रय कुरळे याने नवी मुंबई येथे झालेल्या १ लाख एआयटीए राष्ट्रीय चॅम्पियनशिप स्पर्धेत प्रथमेश शिंदेच्या ( सांगली) समवेत पुरुष दुहेरी ओपन गटात विजेतेपद पटकावले.
या स्पर्धेत संदेश कुरळे याला एकेरी प्रकारात उपांत्य फेरीत पराभव स्वीकारावा लागला. मात्र, दुहेरीत संदेश याने चमकदार कामगिरी बजावत विजेतेपदाला गवसणी घातली.
दुहेरी प्रकारात संदेश व प्रथमेश या जोडीने पहिल्या फेरीत व्यंकटेश नलवडे आणि सुमेध लाड या जोडीचा ६-२, ६-० असा पराभव केला. उपांत्यपूर्व फेरीत त्यांनी दीप मुनीम आणि निरव शेट्टी यांचा ६-४ ६-२ असा पराभव करत उपांत्य फेरी गाठली.
उपांत्य फेरीत संदेश व प्रथमेश या जोडीने आर रघुनंदन आणि यश रैना या जोडीवर ६-३ व ६-२ असा सहज विजय साकारत अंतिम फेरी गाठली. अंतिम फेरीत संदेश व प्रथमेश यांनी पार्थ देवरुखकर आणि अर्जुन अभ्यंकर यांचा ७-५, ३-६, १०-७ अशा अटीतटीच्या लढतीत पराभव करुन विजेतेपद पटकावले.
एकेरीत संदेश कुरळे याने राजेश्वर रेड्डी (६-१, ६-२), नीरव शेट्टी (६-१, ३-०) असा पराभव करुन उपांत्य फेरी गाठली. मात्र, उपांत्य सामन्यात संदेश याला आदित्य दुदुपुढी याच्याकडून ६-२, ४-६, ५-७ असा पराभव स्वीकारावा लागला.
संदेश कुरळे याला मोहिते चॅरिटी यांचे मार्गदर्शन लाभले. संदेश कुरळे हा कोल्हापूरचा असून अर्शद देसाई टेनिस अकॅडमी येथे प्रशिक्षण घेत आहे. त्याला प्रशिक्षक मनाल देसाई व अर्शद देसाई यांचे मार्गदर्शन लाभत आहे.