
अनाहत सिंग, जोशना चिनप्पा, आकांक्षा साळुंके, वीर चोत्रानी यांचा तिसऱ्या फेरीत प्रवेश
जेएसडब्ल्यू इंडियन ओपन स्क्वॉश स्पर्धा

मुंबई : जेएसडब्ल्यू इंडियन ओपन स्क्वॉश स्पर्धेत राष्ट्रीय क्रमवारीतील अव्वल मानांकित अनाहत सिंगसह अव्वल मानांकित आकांक्षा साळुंके व जोशना चिनप्पा या महिला खेळाडूंबरोबर पुरुष गटात वीर चोत्रानी याने तिसऱ्या फेरीत प्रवेश करत आजचा दिवस गाजवला. मात्र , भारताचा अव्वल मानांकित रमित टंडन याला दुसऱ्या फेरीत पराभवाचा धक्का बसला.

बॉम्बे जिमखाना येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत दुसऱ्या दिवशी महिला गटात भारताच्या १७ वर्षीय अनाहत सिंगने स्पेनच्या क्रिस्टीना गोमेजवर ११-५, ९-११, ११-५, ११-२ असा ३० मिनिटात विजय मिळवत तिसरी फेरी गाठली. तर, पाचव्या मानांकित जोशना चिनप्पा हिने उत्कृष्ट नियंत्रण आणि अचूकतेचे दर्शन घडवताना स्पेनच्या सोफिया मॅतेओसचा ११-१, ११-७, ११-८ असा केवळ २० मिनिटात धुव्वा उडवून तिसऱ्या फेरीत धडक मारली.
महिला गटातील आकांक्षा साळुंकेने भारताच्या तन्वी खन्ना हिचा कडवा प्रतिकार करत पहिली गेम गमावल्यानंतर ६-११, ११-८, ११-७, ११-४ असा पराभव केला. हा सामना ३९ मिनिटे चालला. पुरुष गटात वीर चोत्रानी याने पाचव्या मानांकित सिमोन हार्बर्ट याच्यावर ११-४, १०-१२, १६-१४, ११-६ असा पराभव करून खळबळजनक निकालाची नोंद केली.

सहाव्या मानांकित भारताच्या अभय सिंगने फ्रान्सच्या मेवविल सायनीमॅनिकोवर ११-५, ११-७, ११-८ असा अशी मात केली. मात्र, भारताचा अव्वल मानांकित रमित टंडन याला मलेशियाच्या आमीशेन राज चंद्रन विरुद्ध ५२ मिनिटांच्या झुंजीनंतर ५-११, १-११, ११-६, ११-४, ११-६ असा पराभवाचा सामना करावा लागला. त्याचवेळी भारताच्या वेलावन सेंथिलकुमार याने इजिप्तच्या करीम एल टोर्की विरुद्ध जोरदार झुंज दिल्यानंतरही त्याला ७-११, ३-११, ५-११ असा पराभव स्वीकारावा लागला.