
अंतिम सामन्यात मध्य प्रदेश संघावर ११३ धावांनी विजय
गुवाहाटी ः बीसीसीआयतर्फे आयोजित करण्यात आलेल्या २३ वर्षांखालील महिला एकदिवसीय ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेत मुंबई महिला संघाने विजेतेपद पटकावले. अंतिम सामन्यात मुंबई संघाने मध्य प्रदेश महिला संघाचा ११३ धावांनी पराभव करुन विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले.
फुलंग येथील एसीए क्रिकेट अकादमी मैदानावर हा सामना झाला. अंतिम सामन्यात प्रथम फलंदाजी करताना मुंबई महिला संघाने ४६.१ षटकात सर्वबाद २१९ धावसंख्या उभारली. त्यानंतर मध्य प्रदेश महिला संघ ३६.२ षटकात अवघ्या १०६ धावांत सर्वबाद झाला. मुंबईने ११३ धावांनी सामना जिंकून विजेतेपद पटकावले.
मुंबई संघाच्या इरा जाधव व रिया चौधरी या सलामी जोडीने संघाला ३६ धावांची भागीदारी करुन दिली. रिया चौधरी १६ धावांवर बाद झाली. त्यानंतर ठराविक अंतराने मुंबईच्या विकेट पडत होत्या. इरा जाधव हिने ३३ धावा फटकावल्या. रियाने एक षटकार व तीन चौकार मारले. सानिका चालके हिने एक षटकार व दोन चौकारांसह २० धावांची वेगवान खेळी केली.
मानसी हिने २७ चेंडूत ३३ धावा फटकावल्या. तिने सहा चौकार व एक षटकार मारला. महेक पोकर हिने १६ चेंडूत १६ धावा काढताना चार चौकार मारले. कर्णधार खुशी हिने दोन चौकारांसह १० धावांचे योगदान दिले.
सिमरन शेख व ययाती यांनी डावाला आकार दिला. सिमरन हेन ३१ चेंडूत ३२ धावा काढल्या. त्यात तिने चार चौकार मारले. ययाती हिने ५५ चेंडूत २५ धावा काढल्या. तिने तीन चौकार मारले. तळाचे फलंदाज स्वस्तात बाद झाले. मुंबईचा डाव ४६.१ षटकात २१९ धावांवर संपुष्टात आला.
मध्य प्रदेश संघाकडून संस्कृती गुप्ता हिने ५८ धावांत सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. सुची उपाध्याय (२-१४), वैष्णवी शर्मा (२-३६) यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले.
मध्य प्रदेश महिला संघासमोर विजयासाठी २२० धावांचे आव्हान होते. मात्र, कर्णधार सौम्या तिवारीचा अपवाद वगळता एकही फलंदाज टिकून फलंदाजी करू शकला नाही. सौम्या तिवारी हिने एकाकी झुंज देत ९८ चेंडूत ५९ धावा काढल्या. तिने आठ चौकार मारले.
श्रेया दीक्षित (१३), अनुष्का शर्मा (६), कल्याणी जाधव (१), यामिनी बिल्लोरे (०), आयुषी शुक्ला (५), संस्कृती गुप्ता (७), क्रांती गौड (०), वैष्णवी शर्मा (९), सुची उपाध्याय (१) यांच्या निराशाजनक कामगिरीमुळे मध्य प्रदेश संघाला मोठा पराभव स्वीकारावा लागला. मध्य प्रदेश संघाचा डाव ३६.२ षटकात अवघ्या १०६ धावांत गडगडला.
मुंबई संघाकडून मानसी (२-४), सानिका चालके (१-१२), ययाती (२-२६) व कशिश (१-१२) यांनी प्रभावी गोलंदाजी करत प्रत्येकी दोन बळी घेतले. झील डिमेलो हिने ११ धावांत एक गडी बाद केला.