
दीड लाख रुपयांची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात; क्रीडा क्षेत्रात खळबळ
परभणी ः परभणी जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे यांना दीड लाख रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी ताब्यात घेतले आहे. जलतरण तलाव बांधकाम मान्यतेसाठी त्यांनी ही लाच मागितली होती.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सध्या राज्यात कारवाईची धडक मोहीम हाती घेतली आहे. परभणी जिल्ह्यात एसीबी विभागाची ही मोठी कारवाई आहे. जलतरण तलाव बांधण्यास परवानगी देण्यासाठी कविता नावंदे यांनी अडीच लाख रुपयांची लाच मागितली होती. त्यातील, दीड लाख रुपयांची लाच स्वीकारताना परभणी जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे यांना लाचलुचपत विभागाने रंगेहात पकडले आहे.
जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे या लाच स्वीकारताना पकडले गेल्यामुळे परभणी जिल्ह्यातील क्रीडा विभागात या प्रकरणामुळे एकच खळबळ उडाली आहे. एका क्रीडा स्पर्धेचे बिल व जलतरण तलाव बांधकाम मान्यतेसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे यांनी संबंधितांकडे लाच मागितली होती. त्यात दीड लाख रुपयांची लाच घेताना कविता नावंदे यांना रंगेहात पकडण्यात आले. परभणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या कारवाईमुळे जिल्ह्यात प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
क्रीडा विभागातील गैरप्रकारांबाबत आमदारांनी अर्थ संकल्पीय अधिवेशनात लावलेली लक्षवेधी चर्चेत असताना परभणीच्या जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे यांना रंगेहात पकडण्यात आले आहे. मानवत येथील एका तक्रारदाराला एका क्रीडा स्पर्धेचे बिल तसेच जलतरण तलाव बांधकाम मान्यतेसाठी कविता नावंदे यांनी अडीच लाख रुपयांची लाच मागितली होती. त्यातील एक लाख रुपये पहिल्यांदा त्यांनी स्वीकारले होते. त्यानंतर तक्रारदाराला ही रक्कम द्यायची नव्हती. त्यामुळे तक्रारदाराने परभणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानंतर एसीबी विभागाने गुरुवारी सापळा रचून दीड लाख रुपयांची लाच स्वीकारताना कविता नावंदे यांना रंगेहात पकडले. सध्या त्यांना एसीबी कार्यालयात नेण्यात आले असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजेश विटेकर याने लक्षवेधी मांडली होती. तसेच उबाठाचे आमदार राहुल पाटील यांनीही कविता नावंदे यांना निलंबित करण्याची मागणी अधिवेशनात केली होती. तसेच परभणी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातील क्रीडा मार्गदर्शक संजय मुंडे यांनाही क्रीडा स्पर्धेचे बिल काढण्यासाठी पैसे मागितल्याची ऑडियो क्लिप चांगलीच व्हायरल झाली होती.