
शार्दुल ठाकूरची प्रभावी गोलंदाजी; लखनौ सुपर जायंट्स पाच विकेटने विजयी
हैदराबाद : निकोलस पूरन (७०) आणि शार्दुल ठाकूर (४-३४) यांच्या शानदार कामगिरीच्या बळावर लखनौ सुपर जायंट्स संघाने आयपीएल स्पर्धेच्या नव्या हंगामात पहिला विजय साकारत गुण तालिकेत दुसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे.
लखनौ सुपर जायंट्स संघासमोर विजयासाठी १९१ धावांचे आव्हान होते. फलंदाजीसाठी उत्कृष्ट अशा विकेटवर लखनौ संघाच्या डावाची सुरुवात खराब झाली. एडेन मार्करम (१) लवकर बाद झाला. शमीने त्याचा बळी घेऊन संघाला सुरेख सुरुवात करुन दिली. मात्र, त्यानंतर निकोलस पूरन नावाचे वादळ आले. या वादळात हैदराबाद संघाची वाताहात होऊन गेली. निकोलस पूरन याने अवघ्या २६ चेंडूंचा सामना करत ७० धावांची वादळी खेळी केली. धमाकेदार फलंदाजी करताना पूरन याने सहा टोलेजंग षटकार व सहा चौकार मारत मैदान दणाणून सोडले. पूरन व मिचेल मार्श या जोडीने दुसऱ्या विकेटसाठी ११६ धावांची भागीदारी करत संघाचा विजय सुकर बनवला. कमिन्स याने पूरनची विकेट घेऊन संघाला थोडा दिलासा मिळवून दिला.
त्यानंतर कमिन्स याने मिचेल मार्शची ५२ धावांची धमाकेदार खेळी संपुष्टात आणली. मार्शने ३१ चेंडूत दोन षटकार व सात चौकार मारला. आयुष बदोनीने सहा धावांवर बाद झाला. झांपाला मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात तो बाद झाला. हर्षल पटेल याने त्याचा उत्कृष्ट झेल टिपला. त्यावेळी लखनौ संघाला ४२ चेंडूत ३७ धावांची विजयासाठी आवश्यकता होती. हर्षल पटेल याने पंत याला (१५) बाद करुन लखनौला मोठा धक्का दिला.
डेव्हिड मिलर (नाबाद १३) व अब्दुल समद (नाबाद २२) यांनी आक्रमक फटकेबाजी करत १६.१ षटकात पाच बाद १९३ धावा फटकावत संघाला पाच विकेटने विजय मिळवून दिला. पॅट कमिन्स याने २९ धावांत दोन गडी बाद केले. शमी (१-३७), झांपा (१-४६), हर्षल पटेल (१-२८) यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.

हैदराबाद १९० धावा
प्रथम फलंदाजी करताना सनरायझर्स हैदराबाद संघाने २० षटकांत ९ गडी गमावून १९० धावा केल्या. नाणेफेक गमावल्यानंतर फलंदाजीला आलेल्या हैदराबादची सुरुवात चांगली झाली नाही. तिसऱ्या षटकात सलग दोन चेंडूंवर अभिषेक शर्मा आणि इशान किशन यांना बाद करून शार्दुल ठाकूर याने लखनौला चांगली सुरुवात करून दिली. ठाकूरने डावात ४ विकेट्स घेतल्या. या डावात हैदराबादकडून ट्रॅव्हिस हेड (४७) सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता.
अनिकेत वर्माने ५ षटकारांसह ३६ धावांची धमाकेदार खेळी केली. पॅट कमिन्सने फक्त ४ चेंडू खेळले पण ३ षटकार मारत १८ धावा केल्या. या डावांच्या मदतीने सनरायझर्स हैदराबादने १९० धावांचा टप्पा गाठला.
हैदराबादची खराब सुरुवात
सनरायझर्स हैदराबादची सुरुवात चांगली झाली नाही. तिसऱ्या षटकात, संघाने सलग दोन चेंडूंवर अभिषेक शर्मा आणि इशान किशनच्या रूपात दोन मोठे विकेट गमावले. तिसऱ्या षटकाच्या पहिल्या आणि दुसऱ्या चेंडूवर शार्दुल ठाकूरने दोघांनाही बाद केले. त्यानंतर, ट्रॅव्हिस हेड आणि नितीश कुमार रेड्डी यांनी ६१ धावांची भागीदारी केली. ४७ धावा काढल्यानंतर प्रिन्स यादवने हेडला बोल्ड केले. २८ चेंडूंच्या या खेळीत त्याने ३ षटकार आणि ५ चौकार मारले.
अनिकेत वर्माची शानदार खेळी
नितीश आणि हेनरिक क्लासेन यांनी चौथ्या विकेटसाठी ३४ धावांची भागीदारी केली पण क्लासेनचे दुर्दैव झाले आणि तो २६ चेंडूत धावबाद झाला. अनिकेतने १३ चेंडूत ६ षटकारांच्या मदतीने ३६ धावा काढल्या. नितीश कुमार रेड्डीने २८ चेंडूत २ चौकारांसह ३२ धावा केल्या. रेड्डीला रवी बिश्नोई याने क्लिन बोल्ड केले.
शार्दुल ठाकूरने ४ विकेट्स घेतल्या
शार्दुल ठाकूरने सलग २ चेंडूंवर अभिषेक शर्मा आणि इशान किशन यांना बाद करून सामन्यात ४ विकेट्स घेतल्या. त्याने ४ षटकांत ३४ धावा दिल्या. आवेश खान, दिग्वेश सिंग, रवी बिश्नोई आणि प्रिन्स यादव यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.