
- वीर राठोड, रुद्राक्ष बोडके, राघव नाईक यांची शतके हुकली
- श्रीवत्स कुलकर्णी, श्रीनिवास लेहेकर यांची अष्टपैलू कामगिरी
छत्रपती संभाजीनगर ः महाराष्ट्र क्रिकेट संघटनेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या एमसीए अंडर १९ क्रिकेट स्पर्धेत छत्रपती संभाजीनगर संघाने ईस्ट झोन संघाचा एक डाव आणि १७७ धावांनी पराभव केला. या सामन्यात छत्रपती संभाजीनगरच्या वीर राठोड (९९), रुद्राक्ष बोडके (९५), राघव नाईक (९३), श्रीवत्स कुलकर्णी (४-२२, ३-१४), श्रीनिवास लेहेकर (४-३३) यांनी प्रभावी कामगिरी नोंदवत संघाला डावाने विजय मिळवून दिला.

रामपूर येथील पाटील क्रिकेट स्टेडियमवर हा सामना झाला. ईस्ट झोन संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. मात्र, त्यांचा पहिला डाव ३८.२ षटकात अवघ्या १४६ धावांत संपुष्टात आला. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर संघाच्या फलंदाजांनी सामना गाजवला. वीर राठोड याने १६८ चेंडूंचा सामना कर त ९९ धावांची चमकदार खेळी केली. वीर याने एक षटकार व अकरा चौकार मारले. रुद्राक्ष बोडके याने ८२ चेंडूत ९५ धावांची आक्रमक खेळी केली. त्याने दोन षटकार व अठरा चौकार ठोकले. राघव नाईक याने १०३ चेंडूंचा सामना करताना ९३ धावांची वेगवान खेळी केली. राघव याने पाच उत्तुंग षटकार व अकरा चौकार मारले. एकाच सामन्यात तीन फलंदाजांची शतके हुकण्याचा हा दुर्मिळ योग या सामन्यात घडला. छत्रपती संभाजीनगर संघाने फलंदाजांच्या या शानदार कामगिरीच्या बळावर ८२.१ षटकात आठ बाद ४५४ धावसंख्या उभारुन डाव घोषित केला. ईस्ट झोन संघाने दुसऱया डावात ३३.२ षटकात नऊ बाद १३१ धावा काढल्या. छत्रपती संभाजीनगर संघाने एक डाव व १७७ धावांनी दणदणीत विजय नोंदवला.


गोलंदाजीत छत्रपती संभाजीनगर संघाच्या श्रीनिवास लेहेकर व श्रीवत्स कुलकर्णी या दोघांनी घातक गोलंदाजी करत सामना गाजवला. श्रीनिवास लेहेकर याने ३३ धावांत चार विकेट घेतल्या. श्रीवत्स कुलकर्णी याने (३-२२ व ३-१५) अशी दोन्ही डावात प्रभावी कामगिरी बजावली. श्रीवत्स कुलकर्णी याने फलंदाजीत आपली चमक दाखवत अर्धशतक ठोकले. त्याने दोन षटकार व नऊ चौकारांसह ६३ धावांचे योगदान दिले. श्रीनिवास लेहेकर याने ३६ धावांची उपयुक्त खेळी केली. त्याने तीन चौकार व एक षटकार मारला. ईस्ट झोन संघाकडून उदय मगर याने ८६ धावांत तीन गडी बाद केले. मयूर पवार याने ७७ धावांत दोन बळी घेतले.