मुंबई इंडियन्स संघाचा सलग दुसरा पराभव 

  • By admin
  • March 29, 2025
  • 0
  • 16 Views
Spread the love

गुजरात टायटन्स संघाचा ३६ धावांनी विजय, साई सुदर्शन, प्रसिद्ध कृष्णाची प्रभावी कामगिरी  

अहमदाबाद : आयपीएलच्या नव्या हंगामात मुंबई इंडियन्स संघाला सलग दुसरा पराभव स्वीकारावा लागला. गुजरात टायटन्स संघाने घरच्या मैदानावर मुंबईला ३६ धावांनी हरविले. कर्णधार बदलल्यानंतर देखील मुंबईचे भाग्य काही बदलले नाही. तसेच नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय मुंबईसाठी सर्वात महागात पडला. 

पहिल्या सामन्यात पराभवाची परंपरा कायम ठेवणाऱ्या मुंबई इंडियन्स संघासमोर विजयासाठी १९७ धावांचे आव्हान होते. मुंबई संघाच्या डावाची सुरुवात खराब झाली. रोहित शर्मा व रायन रिकेल्टन ही आक्रमक सलामी जोडी स्वस्तात बाद झाली. सिराज याने रोहित व रिकेल्टन या सलामी जोडीला क्लीन बोल्ड केले हे विशेष. रोहितने दोन सलग चौकार ठोकत सुरेख सुरुवात केली. परंतु, सिराजने त्याला अप्रतिम चेंडूवर क्लीन बोल्ड करुन मुंबईला मोठा धक्का दिला. रोहित ८ वर तर रिकेल्टन ६ धावा काढून बाद झाले. 

तिलक वर्मा व सूर्यकुमार यादव या धमाकेदार फलंदाजांनी फटकेबाजी करत धावगती कायम ठेवली. या जोडीने तिसऱ्या विकेटसाठी ६२ धावांची भागीदारी केली. ही भागीदारी धोकादायक बनत असताना प्रसिद्ध याने तिलक वर्माला ३९ धावांवर बाद केले. त्याने तीन चौकार व एक षटकार मारला. रॉबिन मिंझ (३) लवकर बाद झाला. 

सूर्यकुमार यादव आणि कर्णधार हार्दिक पंड्या या जोडीवर धावगती वाढवण्याची जबाबदारी आली. परंतु, प्रसिद्ध कृष्णाने घातक गोलंदाजी करत मुंबईच्या धावगतीला ब्रेक लावला. त्याने सूर्यकुमारची वेगवान खेळी ३८ धावांवर संपुष्टात आणत मोठा अडथळा दूर केला. सूर्यकुमारने २८ चेंडूत चार षटकार व एक चौकार मारला. प्रसिद्धचा बाऊन्सर सूर्यकुमारच्या हेल्मेटवर जोराने आदळला. त्यानंतर सूर्यकुमारने लय गमावली आणि त्यानंतर विकेट देखील गमावली.

रबाडाने हार्दिकची (११) विकेट घेऊन मुंबईची विजयाची आशा संपुष्टात आणली. 
नमन धीर (नाबाद १८), सँटनर (नाबाद १८) यांनी आपले योगदान दिले. २० षटकात मुंबईला सहा बाद १६० धावा काढण्यात यश आले. सिराज (२-३४), प्रसिद्ध कृष्णा (२-१८), कागिसो रबाडा (१-४२), साई किशोर (१-३७) यांनी प्रभावी गोलंदाजी केली. 

प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय महागात 


गुजरात टायटन्सने प्रथम फलंदाजी करताना १९६ अशी आव्हानात्मक धावसंख्या उभारली. शेवटच्या ३ षटकांत मुंबईने जोरदार पुनरागमन केले आणि गुजरातला २०० पेक्षा कमी धावसंख्येवर रोखले. गुजरातसाठी सर्वाधिक धावसंख्या साई सुदर्शनने केली. त्याने ६३ धावांची खेळी केली. नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात गुजरात संघाची मधली फळी पूर्णपणे अपयशी ठरली.

या सामन्यात मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. शुभमन गिल आणि साई सुदर्शन यांनी सुरुवातीलाच मुंबईचा निर्णय चुकीचा सिद्ध केला, कारण  गुजरातने पॉवरप्लेमध्येच एकही विकेट न गमावता ६६ धावा केल्या. हार्दिक पंड्याने गिलला बाद केले. गिल ३८ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. गिल व्यतिरिक्त जोस बटलरनेही २४ चेंडूत ३९ धावांचे योगदान दिले.

१७ षटकांत गुजरात टायटन्सचा स्कोअर ३ गडी गमावून १७० धावा असा होता. पण त्यानंतर, गुजरातच्या फलंदाजांना ३ षटकांत फक्त २६ धावा करता आल्या आणि शेवटच्या १८ चेंडूंत संघाने एकूण ५ विकेट गमावल्या. शेवटच्या ३ षटकांत, गुजरातने साई सुदर्शन, राहुल तेवतिया, शेरफान रदरफोर्ड, रशीद खान आणि साई किशोर यांच्या विकेटही गमावल्या. गुजरातच्या डावात एकूण १० खेळाडू फलंदाजीसाठी आले. संघाच्या शेवटच्या सहा फलंदाजांपैकी पाच फलंदाजांना दुहेरी अंकही गाठता आला नाही.

या सामन्यात हार्दिक पंड्या मुंबई इंडियन्स संघात परतला. त्याच्या नेतृत्वाखाली, मुंबईच्या गोलंदाजीने ताकद दाखवली आहे. एकूण ६ मुंबई खेळाडूंनी गोलंदाजी केली, त्यापैकी पाच जणांनी किमान एक बळी घेतला. कर्णधार हार्दिक पंड्याने सर्वाधिक २ विकेट्स घेतल्या. तर ट्रेंट बोल्ट, दीपक चहर, मुजीब उर रहमान आणि सत्यनारायण राजू यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *