कम्बाइंड बँकर्स, वैद्यकीय प्रतिनिधी, महावितरण संघांची आगेकूच

  • By admin
  • March 30, 2025
  • 0
  • 146 Views
Spread the love

राहुल शर्मा स्पर्धेतील पहिला शतकवीर; मिलिंद पाटील, इंद्रजित उढाण, सुरज वाघ, पांडुरंग धांडे चमकले

छत्रपती संभाजीनगर : गरवारे क्रीडा संकुलावर सुरू असलेल्या कॉस्मो फिल्म प्रायोजित व शहीद भगतसिंह क्रीडा व सांस्कृतिक मंडळ आयोजित ३२व्या शहीद भगतसिंह क्रिकेट सामन्यांमध्ये रविवारी खेळविल्या गेलेल्या साखळी सामन्याच्या पहिल्या झालेल्या सामन्यात कम्बाइंड बँकर्स संघाने सेंट्रल बँक संघावर चुरशीच्या लढतीत १४ धावांनी विजय नोंदवला. दुसऱ्या सामन्यात वैद्यकीय प्रतिनिधी ‘अ’ संघाने सेंट्रल वर्कशॉप संघावर १२१ धावांनी विजय साकारला तर तिसऱ्या सामन्यात महावितरण ‘अ’ संघाने महावितरण ‘ब’ संघावर ७ गडी राखून विजय संपादन केला. शहीद भगतसिंह औद्योगिक चषक क्रिकेट स्पर्धेतील पहिला शतकवीर राहुल शर्मा ठरला. भंडारी इलेक्ट्रिकल्स सामनावीर म्हणून इंद्रजित उढाण, सुरज वाघ व पांडुरंग धांडे यांनी पुरस्कार संपादन केला.

पहिला सामना कम्बाइंड बँकर्स व सेंट्रल बँक या संघादरम्यान खेळविण्यात आला. कम्बाइंड बँकर्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकात ८ बाद १५८ धावा केल्या. यामध्ये मिलिंद पाटील याने अर्धशतक झळकावताना ४३ चेंडूत ५ चौकारांसह ५० धावा, इंद्रजित उढाण याने ३५ चेंडूत २ उत्तुंग षटकार व २ चौकारांसह ३८ धावा, कुणाल फलक याने १४ चेंडूत २ षटकार व ४ चौकारांसह ३१ धावा तर इनायत अली याने ११ चेंडूत २ चौकारांसह १० धावांचे योगदान दिले.

सेंट्रल बँक संघातर्फे गोलंदाजी करताना कर्ण कोळे याने २५ धावात ३ गडी, तुषार खोब्रागडे याने ३० धावात २ गडी तर विनोद देशमुख व मिलिंद राऊत यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला.

प्रत्युत्तरात सेंट्रल बँक संघ २० षटकात सर्वबाद १४४ धावाच करू शकला. यामध्ये रुपेश मानवर याने ४३ चेंडूत ९ चौकारांसह सर्वाधिक ५५ धावांची खेळी केली तर सूर्यनारायण याने १४ चेंडूत १ उत्तुंग षटकार व ४ चौकारांसह २४ धावा, धीरज राजपूत याने २४ चेंडूत १ षटकार व २ चौकारांसह २७ धावा तर संदीप पाटील याने ७ चेंडूत ३ चौकारांसह १३ धावांचे योगदान दिले.

कम्बाइंड बँकर्स संघातर्फे गोलंदाजी करताना सय्यद इनायत अली, कर्णधार शाम लहाने व इंद्रजित उढाण यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले तर हरमितसिंग रागी, अभिषेक ठेंगे व कुणाल फलक यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला.

दुसरा सामना वैद्यकीय प्रतिनिधी ‘अ’ व सेंट्रल वर्कशॉप या संघा दरम्यान खेळविण्यात आला. वैद्यकीय प्रतिनिधी ‘अ’ संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकात ६ बाद १७७ धावा केल्या. यामध्ये अनिरुद्ध शास्त्री याने अप्रतिम खेळी करताना केवळ ६१ चेंडूत १ षटकार व १४ चौकारांसह ८८ धावा, दक्ष काकडे याने २३ चेंडूत ६ चौकारांसह ३४ धावा तर सतीश काळुंके याने ७ चेंडूत ३ चौकारांसह १६ धावांचे योगदान दिले.

सेंट्रल वर्कशॉप संघातर्फे गोलंदाजी करताना शिवाजी नवगिरे व संतोष साखरे यांनी प्रत्येकी २ गडी तर सोहम कांबळे व रवींद्र बोर्डे यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला

प्रत्युत्तरात सेंट्रल वर्कशॉप केवळ १४ षटकात ५६ धावातच गारद झाला. यामध्ये श्रीकांत नागरगोजे याने १९ चेंडूत २ चौकारांसह १३ धावा तर संतोष होनमाळी याने २२ चेंडूत १२ धावांचे योगदान दिले.

वैद्यकीय प्रतिनिधी ‘अ’ संघातर्फे गोलंदाजी करताना सुरज वाघ याने अप्रतिम गोलंदाजी करत केवळ १० धावात ४ महत्त्वपूर्ण गडी बाद केले. तर अनिल थोरे याने १४ धावात ३ गडी तर अनिल थोरे, कर्णधार सतीश माने व साई डहाळे यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला.

तिसरा सामना महावितरण ‘अ’ व महावितरण ‘ब’ या संघादरम्यान खेळविण्यात आला. महावितरण ‘अ’ संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकात ४ बाद १४० धावा केल्या. यामध्ये राहुल शर्मा याने अप्रतिम शतक झळकावताना केवळ ७७ चेंडूत १ उत्तुंग षटकार व १४ चौकारांसह १०१ धावा व विलास राठोड याने ३२ चेंडूत २ चौकारांसह १८ धावाचे योगदान दिले.

महावितरण ‘अ’ संघातर्फे गोलंदाजी करताना स्वप्नील चव्हाण व पांडुरंग धांडे यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला तर बाकीचे दोन फलंदाज धावचित झाले.

प्रत्युत्तरात महावितरण ‘अ’ संघाने विजयी लक्ष केवळ १५ षटकात ३ गड्याच्या मोबदल्यात पूर्ण केले. यामध्ये पांडुरंग धांडे याने अप्रतिम फलंदाजी करताना केवळ ३२ चेंडूत २ उत्तुंग षटकार व ८ चौकारांसह ५७ धावा, ज्ञानेश्वर पाटील याने २७ चेंडूत ४ उत्तुंग षटकार व ४ चौकारांसह ४८ धावा, महेश गटूवार याने १८ चेंडूत २ चौकारांसह १९ धावा तर स्वप्नील चव्हाण याने १५ चेंडूत १२ धावांचे योगदान दिले. महावितरण ‘ब’ संघातर्फे गोलंदाजी करताना बाळासाहेब मगर याने २४ धावात २ गडी तर शशी सपकाळ याने १ गडी बाद केला.

या सामन्यात पंचाची भूमिका सुनील बनसोडे, विशाल चव्हाण, अजय देशपांडे, उदय बक्षी, राजेश सिद्धेश्वर, प्रसाद कुलकर्णी तर गुणलेखकाची भूमिका किरण भोळे यांनी पार पाडली, असे संयोजन समितीचे सदस्य व शहीद भगतसिंह क्रीडा व सांस्कृतिक मंडळाचे उपाध्यक्ष दामोदर मानकापे यांनी सांगितले.

शुक्रवारचे होणारे सामने
सकाळी ८ वाजता : बांधकाम विभाग व होमिओपॅथिक डॉक्टर्स
सकाळी ११ वाजता : एआयटीजी व सेंट्रल वर्कशॉप
दुपारी २ वाजता : रुचा इंजिनिअरिंग व जिल्हा वकील

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *