
छत्रपती संभाजीनगर ः कर्णधार श्रीवत्स कुलकर्णी (नाबाद ८७) आणि राघव नाईक (५२) यांच्या शानदार फलंदाजीच्या बळावर छत्रपती संभाजीनगर अंडर १९ संघाने नांदेड संघाविरुद्ध पहिल्या दिवसअखेर ६८ षटकात आठ बाद ३१३ धावसंख्या उभारली आहे.
महाराष्ट्र क्रिकेट संघटनेतर्फे एमसीए अंडर १९ दोन दिवसीय लीग क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. एमआयटी क्रिकेट स्टेडियमवर छत्रपती संभाजीनगर व नांदेड हा सामना होत आहे. छत्रपती संभाजीनगरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
राम राठोड व रुद्राक्ष बोडके या सलामी जोडीने ७१ धावांची भागीदारी करुन संघाला जोरदार सुरुवात करुन दिली. राम राठोड दोन षटकार व सहा चौकारांसह ३९ धावा काढून बाद झाला. रुद्राक्ष याने ४२ धावा फटकावल्या. त्याने आठ चौकार मारले. जय हारदे याने २५ धावांचे योगदान दिले. त्याने तीन चौकार व एक षटकार मारला. वीर राठोड १० धावांवर बाद झाला.
राघव नाईक याने ७० चेंडूत ५२ धावांची दमदार खेळी केली. त्याने सात चौकार मारले. अविनाश मोटे (८) स्वस्तात बाद झाला. कर्णधार श्रीवत्स कुलकर्णी व राघव नाईक यांनी बहारदार फलंदाजी करत डावाला आकार दिला. श्रीवत्स कुलकर्णी या स्पर्धेत कमालीचा फॉर्मात आहे. श्रीवत्स कुलकर्णी याने ११७ चेंडूंचा सामना करत धमाकेदार अर्धशतक ठोकले. त्याने एक षटकार व दहा चौकारांसह नाबाद ८७ धावा काढल्या. कर्णधारपदाला साजेशी फलंदाजी करत त्याने संघाची स्थिती भक्कम केली. श्रीवत्स याला शतकासाठी आता फक्त १३ धावांची गरज आहे. श्रीनिवास लेहेकर याने ३४ चेंडूत २४ धावा फटकावल्या. त्याने दोन चौकार व एक षटकार मारला. सुमित सोळुंके याने १० धावा काढल्या. जैद पटेल ४ धावांवर नाबाद आहे.
नांदेड संघाकडून आदित्य घोगरे याने ८९ धावांत तीन विकेट घेतल्या. रेहान रमजानी याने ८९ धावांत दोन गडी बाद केले. अमेय जाधव याने ३५ धावांत दोन बळी घेतले. शंभू काळे याने ८ धावांत एक विकेट घेतली. अष्टपैलू श्रीवत्स कुलकर्णी याला आंतरराष्ट्रीय क्रिकेट प्रशिक्षक कर्मवीर लव्हेरा यांचे मार्गदर्शन लाभत आहे.