
मिशन लक्ष्यवेध
छत्रपती संभाजीनगर ः क्रीडा खात्यातर्फे राज्यभर मिशन लक्ष्यवेध हा उपक्रम राबवण्यात येत आहे. या उपक्रमात एकूण १२ क्रीडा प्रकारांची निवड करण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पाच खेळांचा समावेश असून या पाच खेळांच्या खासगी क्रीडा अकादमींना आर्थिक सहाय्य देण्यात येईल असे जिल्हा क्रीडा अधिकारी बाजीराव देसाई यांनी सांगितले.
मिशन लक्ष्यवेध अंतर्गत निवडण्यात आलेल्या अॅथलेटिक्स, आर्चरी, बॅडमिंटन, बॉक्सिंग, हॉकी, लॉन टेनिस, रोईंग, शुटींग, सेलिंग, टेबल टेनिस, वेटलिफ्टिंग, कुस्ती या १२ क्रीडा प्रकारांच्या राज्यातील उत्तम खेळाडू निर्माण करणाऱ्या खासगी अकादमींना आर्थिक सहाय्य देऊन अशा संस्थांचे सक्षमीकरण करण्यात येणार आहे. एकूण १२ खेळांपैकी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील लोकप्रिय अॅथलेटिक्स, बॉक्सिंग, हॉकी, शुटींग, वेटलिफ्टिंग या पाच खेळ निवडले आहेत. या खेळाशी संबंधित क्रीडा संघटना, क्रीडा संस्था, क्रीडा अकादमी यांनी विहित नमुन्यातील अर्ज मिशन लक्ष्यवेध या योजनेचा लाभ घेण्यासाठी जास्तीत जास्त संख्येने प्रस्ताव ५ एप्रिल २०२५ पर्यंत कार्यालयीन वेळेत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, छत्रपती संभाजीनगर येथे पोहोच करावे असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी बाजीराव देसाई यांनी केले आहे.
मिशन लक्ष्यवेध अंतर्गत खासगी अकादर्मीना आर्थिक सहाय्य करण्यात येणार आहे. त्यादृष्टीने संबंधित अकादमी मधील खेळाडू, क्रीडा मार्गदर्शक, सहाय्यक प्रशिक्षक, प्रशिक्षणासाठी उपलब्ध पायाभूत सुविधा व त्यांचा स्तर, क्रीडा साहित्य व क्रीडा अकादमीच्या कामगिरींचे गुणांकन करण्यात येणार आहे. अ श्रेणीतील अकादमींना ३० लाख रुपये, ब श्रेणीतील अकादमींना २० लाख रुपये व क श्रेणीतील अकादमींना १० लाख रुपये रक्कम दिली जाणार आहे. ही रक्कम पायाभूत क्रीडा सुविधा उभारणी, प्रशिक्षक मानधन, क्रीडा व प्रशिक्षण उपकरणे या बाबींवर खर्च करण्यासाठी देण्यात येणार आहे.