
गुरुकुल अकादमी क्रिकेट ः रबमीत सिंग सोधी, जसराज सिंगची लक्षवेधक कामगिरी
छत्रपती संभाजीनगर ः गुरुकुल क्रिकेट अकादमीतर्फे आयोजित करण्यात आलेल्या आंतर अकादमी क्रिकेट स्पर्धेत गुरुकुल जायंट्स संघाने गुरुकुल सनरायझर्स संघावर चार विकेट राखून विजय नोंदवला. जसराज सिंग याने सामनावीर पुरस्कार पटकावला.

डी वाय पाटील क्रिकेट मैदानावर ही स्पर्धा होत आहे. गुरुकुल सनरायझर्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली आणि २३ षटकात सात बाद २२१ अशी भक्कम धावसंख्या उभारली. या धावसंख्येचा यशस्वी पाठलाग करताना गुरुकुल जायंट्स संघाने २१.२ षटकात सहा बाद २२२ धावा फटकावत चार विकेटने सामना जिंकला. मोठ्या धावसंख्येचा हा सामना अतिशय रंगतदार झाला.

या सामन्यात रबमीत सिंग सोधी याने धमाकेदार शतक ठोकले. रबमीत याने अवघ्या ५३ चेंडूत ११० धावांची स्फोटक खेळी करुन सामना गाजवला. त्याने आपल्या शतकी खेळीत तब्बल १० षटकार व नऊ चौकार ठोकले हे विशेष. आदित्य बागुल याने ४५ चेंडूत ६८ धावा काढल्या. त्याने आठ चौकार व एक षटकार मारला. जसराज सिंग याने ३१ चेंडूत ५८ धावा फटकावल्या. जसराज याने तीन उत्तुंग षटकार व सात चौकार मारले. गोलंदाजीत जयेश कावळे (२-२८), रेयांश अडचित्रे (२-२८) व आयुष बुगडे (२-५६) यांनी प्रभावी गोलंदाजी करत प्रत्येकी दोन विकेट घेतल्या.
संक्षिप्त धावफलक ः गुरुकुल सनरायझर्स ः २३ षटकात सात बाद २२१ (कार्तिक गेहलोत ३२, शौर्य राठोड १५, प्रवीण भवानी १४, रबमीत सिंग सोधी ११०, शौर्य अग्रवाल १०, इतर ३५, आयुष बुगडे २-५६, रेयांश अडचित्रे २-२८, साद शेख १-४१, आरव लोढा १-५, जसराज सिंग १-४३) पराभूत विरुद्ध गुरुकुल जायंट्स ः २१.२ षटकात सहा बाद २२२ (जयंत पांडे १७, आयुष बुगडे ४०, आदित्य बागुल नाबाद ६८, जसराज सिंग ५८, साद शेख ६, इतर २६, जयेश कावळे २-२८, रबमीत सिंग सोधी १-४१, लोवेश जैस्वाल १-१२, आदित्य श्रीमाळी १-८). सामनावीर ः जसराज सिंग.