
अशी कामगिरी करणारा १२वा भारतीय गोलंदाज
हैदराबाद ः गुजरात टायटन्स संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज आयपीएल स्पर्धेत पॉवरप्लेमध्ये विरोधी संघासाठी घातक ठरत आहे. आयपीएल स्पर्धेत १०० विकेट घेण्याची कामगिरी सिराज याने पूर्ण केली आहे. ९७ सामन्यात सिराजने ही ऐतिहासिक कामगिरी केली आहे.
यंदाच्या आयपीएल हंगामात मोहम्मद सिराज हा नवीन फ्रँचायझीकडून खेळत आहे. सध्या सिराज हा उत्तम फॉर्ममध्ये आहे. या हंगामात पॉवरप्लेमध्ये सिराज हा विरोधी संघासाठी अतिशय घातक गोलंदाज ठरत आहे. सनरायझर्स हैदराबाद संघाविरुद्धच्या सामन्यात सिराज याने भेदक गोलंदाजी केली. सिराज याने ट्रॅव्हिस हेड आणि अभिषेक शर्मा या धमाकेदार फलंदाजांना स्वस्तात बाद करुन हैदराबाद संघाला मोठा धक्का दिला. या धक्क्यातून हैदराबाद संघ अखेरपर्यंत सावरू शकला नाही.
आयपीएल स्पर्धेत सिराज व हेड हे कधीही एकमेकांसमोर आले नव्हते. या सामन्यात सिराज याने पहिल्याच षटकात हेड याला बाद करुन आपली भेदकता दाखवून दिली. सिराज याने पॉवरप्लेमध्ये सहा विकेट घेतल्या आहेत. या बाबतीत सिराज याने लखनौच्या शार्दुल ठाकूर याला मागे टाकले आहे. शार्दुलने आतापर्यंत पॉवरप्लेमध्ये पाच गडी टिपले आहेत. खलील अहमद व मिचेल स्टार्क या वेगवान गोलंदाजांनी प्रत्येकी चार विकेट घेतल्या आहेत.
आयपीएल स्पर्धेत १०० वा बळी घेणारा मोहम्मद सिराज हा बारावा भारतीय गोलंदाज बनला आहे. आयपीएल स्पर्धेत एकूण गोलंदाजांमध्ये १०० वा बळी घेणारा सिराज हा २६ वा गोलंदाज आहे.