
ठाणे जिल्हा क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाची सहविचार सभा संपन्न
ठाणे ः विना अनुदानित शाळांना अनुदानित शाळांप्रमाणे सेवाशर्ती लागू करण्यासाठी महासंघ आग्रही आहे असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाचे अध्यक्ष शरदचंद्र धारुरकर यांनी येथे केले आहे.
महाराष्ट्र राज्य क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाच्या मार्गदर्शनाखाली ठाणे जिल्हा क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाची पहिली कार्यकारणी सहविचार सभा रविवारी एम एच विद्यालय ठाणे येथे यशस्वीपणे संपन्न झाली. या सहविचार सभेसाठी महाराष्ट्र राज्य महासंघाचे राज्य अध्यक्ष शरदचंद्र धारूरकर, मुंबई विभागीय सचिव अंकुर आहेर, ठाणे जिल्हा महासंघ अध्यक्ष प्रमोद वाघमोडे, सचिव गणेश मोरे, कार्याध्यक्ष ऐश्वर्या गाडे, कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष आर वाय जाधव, पुणे जिल्हा अध्यक्ष दिलीप ढमाले, दौंड तालुका अध्यक्ष पुणे जिल्हा उपाध्यक्ष नामदेव खडके,ठाणे मनपा समन्वयक शंकर बरकडे, महिला आघाडी आयेशा वाडकर व त्यांची सर्व टीम यांची उपस्थिती होती.

सहविचार सभेचे सूत्रसंचालन एकनाथ पवळे व रोहिणी डोंबे यांनी केले. ठाणे महानगरपालिका क्रीडा समन्वयक शंकर बरकडे यांनी प्रास्ताविकेतून उपस्थितांचे स्वागत केले. ठाणे जिल्हा, सर्व महानगरपालिका व तालुके बांधणीची माहिती जिल्हा सचिव गणेश मोरे यांनी दिली. पुणे जिल्हा अध्यक्ष दिलीप ढमाले व कोल्हापूर विभाग अध्यक्ष आर. वाय. जाधव यांनी महासंघाचे ४५ वर्षातील गौरवास्पद कामगिरीचा आढावा घेतला.
ठाणे जिल्हा महासंघाची पुढील वाटचालीबद्दल माहिती जिल्हा अध्यक्ष प्रमोद वाघमोडे यांनी दिली. शरदचंद्र धारुरकर यांच्या हस्ते ठाणे जिल्हा महासंघाच्या सर्व पदाधिकाऱ्यांना राज्य संघटनेचे अधिकृत निवड पत्र दिले. तसेच ठाणे मनपा, कल्याण-डोंबिवली मनपा, भिवंडी निजामपूर मनपा, उल्हासनगर मनपा, नवी मुंबई मनपा व सर्व तालुके यांचे अध्यक्ष व सचिव यांचा अधिकृत निवड पत्र देण्यात आले. तसेच दौंड तालुका अध्यक्ष व पुणे जिल्हा उपाध्यक्ष नामदेव खडके यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार करण्यात आला.
या सभेत क्रीडा व शारीरिक शिक्षण विषयात येणारे प्रश्न व अडचणी यावर चर्चा करण्यात आली तसेच भविष्यात महासंघाकडून हाताळण्यात येणाऱ्या विषयांचा आढावा घेण्यात आला. ठाणे जिल्ह्यातील सर्व मनपा व तालुका पदाधिकाऱ्यांची मोठी उपस्थिती होती. त्यांनी आपले प्रश्न मांडले. शालेय क्रीडा स्पर्धा यशस्वीपणे राबवण्यासाठी जिल्हा क्रीडा परिषदेवर तसेच महानगर पालिकांना जिल्ह्याचा दर्जा प्राप्त असल्याने महानगरपालिकेच्या क्रीडा समितीवर महासंघाचे दोन प्रतिनिधी घेतले पाहिजे, असे ठाणे जिल्हा कोषाध्यक्ष दौलत चव्हाण यांनी मत व्यक्त केले. महाराष्ट्र शासनाचा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार संघटक/कार्यकर्ते हा पुरस्कार २०१८-१९ पासून शासनाने बंद केला आहे. प्रत्येक क्रीडा संघटना ही कार्यकर्त्यांच्या मेहनतीवर प्रगती करत असते. तेव्हा नियमावलीत योग्य ते बदल करुन संघटक/कार्यकर्ते पुरस्कार पुन्हा सुरू केला पाहिजे, असे मुंबई विभागीय सचिव अंकुर आहेर यांनी मत व्यक्त केले.
खासगी विना अनुदानित व स्वयं अर्थ संचालित शाळांमध्ये क्रीडा शिक्षकांना दबावाखाली काम करावे लागते. तसेच शिक्षकांना पुरेसे वेतन मिळत नाही या विषयावर राज्य महासंघ अध्यक्ष शरदचंद्र धारूरकर यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, या विना अनुदानित शाळांना अनुदानित शाळांप्रमाणे सेवाशर्ती लागू करण्यासाठी महासंघ शासनाकडे आग्रही भूमिका मांडणार आहे. यासाठी ज्याप्रमाणे बाळ रडल्याशिवाय आई त्याला उचलून घेत नाही त्याप्रमाणे सर्व क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षकांनी महासंघाच्या नेतृत्वाखाली संघटित होणे आवश्यक आहे.
महाराष्ट्र राज्य क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघ शिक्षकांचे केवळ अधिवेशन घेण्यावर भर देत नाही तर आंदोलनातून शिक्षकांना न्याय देण्यावर जास्त भर देतो. शिवछत्रपती संघटक/कार्यकर्ते पुरस्कार सुरू करण्यासाठी क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांची तातडीने भेट घेणार असे धारुरकर यांनी सांगितले. तसेच जून अखेरीस क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षकांची कार्यशाळा घेण्याचे आदेश राज्य अध्यक्ष शरदचंद्र धारुरकर यांनी दिले. शेवटी जिल्हा संघटक पांडुरंग ठोंबरे यांनी आभार प्रदर्शन केले. ही सहविचार सभा यशस्वी करण्यासाठी ठाणे महानगरपालिका क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाचे अध्यक्ष रणजित शिंदे व सचिव एकनाथ पवळे यांच्या नेतृत्वाखाली महिला आघाडी प्रमुख आयेशा वाडकर, प्रतिमा महाडिक, विशाखा आर्डेकर, तसेच सर्व ठाणे महानगरपालिका महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी मेहनत घेतली. सामुदायिक राष्ट्रगीताने सहविचार सभेची सांगता झाली.