
जोस बटलरच्या जागी निवड
लंडन ः आयपीएल २०२५ दरम्यान इंग्लंड क्रिकेट संघाने एक मोठी घोषणा केली. त्यांचे अनेक खेळाडू आयपीएलमध्ये खेळत आहेत. दरम्यान, इंग्लंड क्रिकेट बोर्डाने नवीन कर्णधाराची घोषणा केली आहे. २०२५ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमधून बाहेर पडल्यानंतर जोस बटलर याने एकदिवसीय आणि टी २० फॉरमॅटच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला. आता त्याच्या जागी हॅरी ब्रूककडे संघाची कमान सोपवण्यात आली आहे. ब्रूकने इंग्लंडसाठी अनेक वेळा दमदार कामगिरी केली आहे.
जून २०२२ मध्ये बटलरला इंग्लंडचे कर्णधारपद मिळाले. इयान मॉर्गनच्या राजीनाम्यानंतर त्याने पदभार स्वीकारला. २०२२ मध्ये इंग्लंडने टी-२० विश्वचषक जिंकला. पण त्यानंतर २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषक आणि २०२४ च्या टी-२० विश्वचषकात संघाला काही विशेष कामगिरी करता आली नाही. २०२५ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्येही इंग्लंडची निराशाजनक कामगिरी झाली. इंग्लंड संघ गटातून बाहेर पडला. त्यानंतर बटलरने राजीनामा दिला. तो सुमारे २ वर्षे आणि ८ महिने संघाचा कर्णधार राहिला.
हॅरी ब्रूकने इंग्लंडकडून ४४ टी २० आणि २६ एकदिवसीय सामने खेळले आहेत. या काळात त्याने चांगली कामगिरी केली आहे. कर्णधारपदी नियुक्ती झाल्यावर ब्रूक म्हणाला, “इंग्लंड क्रिकेट संघाचा कर्णधार होणे माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे. मी लहान असल्यापासून आणि व्हर्फेडेलमधील बर्ली येथे क्रिकेट खेळलो तेव्हापासून मी यॉर्कशायरचे प्रतिनिधित्व करण्याचे, इंग्लंडकडून खेळण्याचे आणि कदाचित एके दिवशी संघाचे नेतृत्व करण्याचे स्वप्न पाहिले होते. आता मला ती संधी मिळाली आहे. हे माझ्यासाठी खूप अर्थपूर्ण आहे.”
हॅरी ब्रूकची एकूण कामगिरी
ब्रूकने इंग्लंडसाठी २६ एकदिवसीय सामन्यांमध्ये ८१६ धावा केल्या आहेत. या काळात त्याने एक शतक आणि पाच अर्धशतके झळकावली आहेत. ब्रूकने ४४ टी २० सामन्यांमध्ये ७९८ धावा केल्या आहेत. त्याने या फॉरमॅटमध्ये ७९८ धावा केल्या आहेत. ब्रूकने इंग्लंडकडून टी-२० मध्ये चार अर्धशतके झळकावली आहेत. त्याने २४ कसोटी सामनेही खेळले आहेत. या काळात त्याने २२८१ धावा केल्या आहेत.