
गतविजेते केकेआर घरच्या मैदानावर चार धावांनी पराभूत
कोलकाता ः धावांचा पाऊस पडलेल्या या सामन्यात लखनौ सुपर जायंट्स संघाने गतविजेत्या केकेआर संघाला अवघ्या चार धावांनी पराभूत केले. निकोलस पूरन, मिचेल मार्श यांच्या वादळी फलंदाजीने लखनौ संघाने विजयी आगेकूच कायम ठेवली.
घरच्या मैदानावर खेळताना गतविजेत्या केकेआर संघासमोर विजयासाठी २३९ धावांचे मोठे लक्ष्य होते. या धावसंख्येचा पाठलाग करताना केकेआर संघ अवघ्या ४ धावांनी पराभूत झाला. क्विंटन डी कॉक (१५) व सुनील नरेन (३०) या सलामी जोडीने डावाची सुरुवात आक्रमक केली. परंतु, क्विंटन १५ धावांवर बाद झाला. सुनील नरेन व कर्णधार अजिंक्य रहाणे या जोडीने अर्धशतकी भागीदारी नोंदवली. सुनील नरेन १३ चेंडूत ३० धावा काढून बाद झाला. त्याने चार चौकार व दोन षटकार मारले.
अजिंक्य रहाणे याने तुफानी फलंदाजी केली. त्याने अवघ्या ३५ चेंडूत ६५ धावा फटकावल्या. या वादळी अर्धशतकी खेळीत त्याने आठ चौकार व दोन षटकार ठोकले. व्यंकटेश अय्यर याने २९ चेंडूत ४५ धावा फटकावल्या. त्याने सहा चौकार व एक षटकार मारला. त्यानंतर रमणदीप सिंग (१), अंगकृष रघुवंशी (५), आंद्र रसेल (७) हे धमाकेदार फलंदाज स्वस्तात बाद झाले. त्याचा फटका केकेआर संघाला बसला. रिंकू सिंग याने १५ चेंडूत नाबाद ३८ धावा फटकावत संघाला विजयासमीप आणले. परंतु, अवघ्या चार धावांनी केकेआर संघ पराभूत झाला. केकेआर संघाने २० षटकात सात बाद २३४ धावंसख्या उभारली. आकाश दीप (२-५५), शार्दुल ठाकूर (२-५२) यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.
लखनौ संघाचा धावांचा पाऊस
प्रथम फलंदाजी करताना लखनौ सुपर जायंट्स संघाने २३८ धावांचा पाऊस पाडला. कोलकात्यातील ईडन गार्डन्स मैदानावर खेळल्या जाणाऱ्या या सामन्यात केकेआर संघाच्या गोलंदाजांना चांगलाच फटका बसला. मिचेल मार्श आणि निकोलस पूरन यांनी आपली लय कायम ठेवत वादळी अर्धशतकी खेळी केली. यावेळी एडेन मार्करामनेही कहर केला आणि ४७ धावांची खेळी केली. दुसरीकडे, मार्श आणि पूरन यांनी मिळून १३ चौकार आणि १३ षटकार मारले.
मार्श-पूरनची वादळी फलंदाजी
या सामन्यात केकेआर संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. लखनौ सुपर जायंट्स संघाने परिस्थितीचा पुरेपूर फायदा घेतला. मिचेल मार्श आणि एडेन मार्कराम यांनी ९९ धावांची सलामी भागीदारी करत कहर केला. २८ चेंडूत ४७ धावा करून मार्कराम बाद झाला, पण मार्शकडे पाहून असे वाटत होते की तो लांब फटके मारण्याच्या मूडमध्ये मैदानात आला होता. त्याने ४८ चेंडूत ८१ धावा केल्या आणि यादरम्यान त्याने ६ चौकार आणि ५ षटकार मारले. दुसरीकडे, निकोलस पूरनने आपला फॉर्म कायम ठेवत ३६ चेंडूत २४१ च्या स्ट्राईक रेटने ७ चौकार आणि ८ षटकारांसह ८७ धावा केल्या.
शेवटच्या ९ षटकांत १३२ धावा
एकेकाळी लखनौ सुपर जायंट्सने ११ षटकांत एका विकेटच्या मोबदल्यात १०६ धावा केल्या होत्या. या षटकात मार्कराम याने आपली विकेट गमावली. सहसा, विकेट पडल्यानंतर संघांचा धावगती कमी होतो. पण लखनौने शेवटच्या ९ षटकांत धावांचा वेग वाढवला. शेवटच्या ९ षटकांपैकी फक्त एकाच षटकात लखनौने १० पेक्षा कमी धावा केल्या. शेवटच्या ९ षटकांत, एलएसजीच्या खेळाडूंनी मिळून १३२ धावा केल्या. १६ व्या षटकात मार्श बाद झाला, त्यानंतर पूरनने केकेआर संघाच्या गोलंदाजांना झोडपले. आंद्रे रसेलने टाकलेल्या १८ व्या षटकात, पूरनने एकट्याने २४ धावा केल्या ज्यामध्ये २ षटकार आणि ३ चौकारांचा समावेश होता. हर्षित राणा याने ५१ धावांत दोन गडी बाद केले.