प्रियांश आर्यच्या वादळी शतकाने पंजाब १८ धावांनी विजयी 

  • By admin
  • April 8, 2025
  • 0
  • 21 Views
Spread the love

चेन्नई सुपर किंग्जचा चौथा पराभव 

चंदीगड : युवा फलंदाज प्रियांश आर्य याच्या वादळी शतकाच्या (१०३) बळावर पंजाब किंग्ज संघाने चेन्नई सुपर किंग्ज संघाचा १८ धावांनी पराभव केला. पंजाब संघाचा हा तिसरा विजय आहे.  

चेन्नई सुपर किंग्ज संघासमोर विजयासाठी २२० धावांचे लक्ष्य होते. रचिन रवींद्र आणि डेव्हॉन कॉनवे या सलामी जोडीने ६१ धावांची भागीदारी करुन संघाला सुरेख सुरुवात करुन दिली. परंतु, मॅक्सवेल याने रचिन रवींद्र याची २३ चेंडूतील ३६ धावांची जलद खेळी संपुष्टात आणली. त्याने सहा चौकार मारले. पाठोपाठ कर्णधार रुतुराज गायकवाड (१) पुन्हा एकदा अपयशी ठरला. ६२ धावसंख्येवर चेन्नईने दोन धमाकेदार फलंदाज गमावले. 

इम्पॅक्ट प्लेयर शिवम दुबे आणि कॉनवे या आक्रमक फलंदाजांनी ८९ धावांची भागीदारी करत सामन्यातील रंगत कायम ठेवली. लॉकी फर्ग्युसनने शिवम दुबेला ४२ धावांवर बाद केले. दुबेने २७ चेंडूत ३ चौकार व २ षटकार मारले. कॉनवे याला ६९ धावांवर निवृत्त करण्यात आले. कॉनवे याने सहा चौकार व दोन षटकार मारले. कॉनवेच्या जागी रवींद्र जडेजा मैदानात उतरला. महेंद्रसिंग धोनी याने १६व्या षटकात मैदानात पाऊल टाकले. धोनीने तीन उत्तुंग षटकार ठोकत चाहत्यांना अपार आनंद मिळवून दिला. यश ठाकूर याने धोनीची १२ चेंडूतील आक्रमक २७ धावांची खेळी संपुष्टात आणली. चहल याने धोनीचा झेल टिपला. धोनीने एक चौकार व तीन षटकार मारले. धोनी बाद झाला आणि चेन्नईचा पराभव देखील निश्चित झाला. चेन्नईने २० षटकात पाच बाद २०१ धावा काढल्या. चेन्नईचा हा चौथा पराभव आहे. पंजाबने १८ धावांनी सामना जिंकला. 

पंजाब किंग्ज संघाची दमदार फलंदाजी

मुल्लानपूरमध्ये पंजाब किंग्जने चेन्नई सुपर किंग्ज संघाच्या गोलंदाजांना धुडकावून लावले. पंजाबकडून तरुण प्रियांश आर्यने ४२ चेंडूत १०३ धावांची धमाकेदार खेळी केली. त्याने ७ चौकार आणि तब्बल ९ षटकार ठोकले. शशांक सिंगने ३६ चेंडूत ५२ धावा आणि मार्को जानसेनने १९ चेंडूत ३४ धावा करून नाबाद राहिले. दोघांनीही सातव्या विकेटसाठी ३८ चेंडूत ६५ धावांची भागीदारी केली. या तिघांच्या दमदार खेळीमुळे पंजाब किंग्जने २० षटकांत ६ गडी गमावून २१९ धावा केल्या.

मनोरंजक गोष्ट अशी होती की पंजाब किंग्जचे सर्व मोठे खेळाडू अपयशी ठरले. तरीही, संघाने २०० पेक्षा जास्त धावसंख्या नोंदवली. प्रभसिमरन सिंग (००), कर्णधार श्रेयस अय्यर (०९), ग्लेन मॅक्सवेल (०१), मार्कस स्टोइनिस (०४) आणि नेहल वधेरा (०९) हे दोन अंकी धावसंख्या गाठू शकले नाहीत.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या पंजाब किंग्जची सुरुवात चांगली झाली नाही. स्फोटक सलामीवीर प्रभसिमरन सिंग खाते न उघडताच बाद झाला. त्याला मुकेश चौधरी याने बाद केले. त्यानंतर कर्णधार श्रेयस अय्यरला खलील अहमदने बोल्ड केले. तो फक्त ९ धावा करू शकला.

जेव्हा ३२ धावांवर दोन विकेट पडल्या तेव्हा सर्वांच्या नजरा मार्कस स्टोइनिसवर होत्या, पण त्यानेही निराशा केली. स्टोइनिस चार धावा करून बाद झाला. नेहल वधेरा ९ धावा करून बाद झाला. आता ग्लेन मॅक्सवेलकडून मोठ्या अपेक्षा होत्या. पण मॅक्सवेल पुन्हा एकदा अपयशी ठरला.

एका बाजूला विकेट सतत पडत होत्या आणि दुसऱ्या बाजूला २४ वर्षीय प्रियांश आर्य चौकार आणि षटकार मारत होता. त्याने ३९ चेंडूत आपले शतक पूर्ण केले. तो आयपीएलमध्ये शतक करणारा आठवा अनकॅप्ड फलंदाज ठरला आहे. प्रियांश आर्यने ४२ चेंडूत १०३ धावांची धमाकेदार खेळी केली. त्याने ७ चौकार आणि ९ षटकार मारले. प्रियांश याने नवा इतिहास रचला आहे. तो पंजाब किंग्जसाठी सर्वात जलद शतक करणारा दुसरा फलंदाज बनला आहे. 

शशांक सिंग यानेही मैदानाच्या चौफेर फटकेबाजी केली. शशांक ३६ चेंडूत ५२ धावा करून नाबाद परतला. त्याने २ चौकार आणि ३ षटकार मारले. त्याच वेळी, मार्को जॅन्सेन याने चेन्नईच्या गोलंदाजांना चांगलेच झोडपले. तो १९ चेंडूत ३४ धावा करून नाबाद परतला. त्याने २ चौकार आणि २ षटकार मारले.

चेन्नईकडून खलील अहमदने चार षटकांत ४५ धावा देत दोन विकेट्स घेतल्या. रविचंद्रन अश्विनने ४ षटकांत ४८ धावा देत दोन विकेट्स घेतल्या. मथिशा पाथिरानाने एकही विकेट न घेता ५२ धावा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *