
नागपूर ः एसजीआर क्रिकेट अकादमीतर्फे आयोजित करण्यात आलेल्या ए डी गडकरी स्मृती स्पर्धेत एसबी सिटी संघाने एसजीआर संघावर सहा विकेट राखून मोठा विजय संपादन केला आणि विजेतेपद पटकावले.
एसबी सिटी संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि एसजीआर संघाला ३९.५ षटकात २२६ धावांवर सर्वबाद केले. कश्यप पाटस्कर याने ९३ चेंडूत नऊ चौकारांसह ७७ धावांचे योगदान दिले. कर्णधार जगदीश मांटे, श्रीधर शर्मा, विवेक बिश्नोई, जयेश कुंभारे यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.
प्रत्युत्तरात एसबी सिटी संघाने ३६ षटकात २२७ धावसंख्या फटकावत शानदार विजय साकारला. सैश भिसे याने ८७ चेंडूत ११ चौकार व एक षटकारासह नाबाद १०१ धावांची खेळी करुन संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. श्रीधर शर्मा याने फक्त ३३ चेंडूत चार चौकार व चार षटकारांसह आक्रमक नाबाद ५३ धावा काढल्या. मानव आचार्य याने ५३ चेंडूत सात चौकारांसह ४८ धावा काढल्या. आर्यन सिंग याने दोन गडी बाद केले. श्रीधर शर्मा याला सामनावीर पुरस्कार प्रदान करण्यात आला.