
ठाणे ः ठाणे येथील श्री मावळी मंडळ संस्थेच्या शताब्दी वर्षानिमित्त व शिवजयंती उत्सवानिमित्त राज्य पातळीवरील पुरुष व महिला गटाच्या कबड्डी स्पर्धा २५ ते २९ एप्रिल या कालावधीमध्ये आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत एकूण ५ लाख रुपयांची पारितोषिके ठेवण्यात आली आहेत.
या स्पर्धेत पुरुष गटात विजेत्या संघाला १ लाख रुपये, उपविजेत्या संघाला ७५ हजार रुपये व उपांत्य फेरीतील पराभूत संघाला २५ हजार रुपये रोख रक्कम व चषक देऊन गौरविण्यात येणार आहे. तसेच महिला गटात विजेत्या संघाला ५५ हजार रुपये, उपविजेत्या संघाला ४४ हजार रुपये व उपांत्य फेरीतील पराभूत संघाला २२ हजार रुपये रोख रक्कम व चषक देऊन गौरविण्यात येणार आहे.
तसेच पुरुष गटात व महिला गटात उत्कृष्ट खेळाडूस १० हजार रुपये, उत्कृष्ट चढाईपटू खेळाडूस ५ हजार रुपये व उत्कृष्ट पकड करणाऱ्या खेळाडूस ५ हजार रुपये रोख रक्कम देऊन गौरवण्यात येणार आहे. स्पर्धेतील प्रत्येक दिवसाच्या उत्कृष्ट खेळाडूस २ हजार रुपये रोख रक्कम देऊन गौरविण्यात येणार आहे.
स्पर्धेचे प्रवेश अर्ज श्री मावळी मंडळ कार्यालय (ठाणे) व महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या maharashtrakabaddi.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. स्पर्धेचे अर्ज श्री मावळी मंडळ कार्यालय, ठाणे येथे १८ एप्रिलपर्यंत स्विकारले जातील.