गुजरात टायटन्सचा सलग चौथा विजय

  • By admin
  • April 9, 2025
  • 0
  • 17 Views
Spread the love

राजस्थान रॉयल्स संघाचा ५८ धावांनी पराभव, साई सुदर्शनची दमदार फलंदाजी 

अहमदाबाद : साई सुदर्शनची धमाकेदार फलंदाजी आणि गोलंदाजांच्या अचूक व प्रभावी कामगिरीच्या बळावर गुजरात टायटन्स संघाने राजस्थान रॉयल्स संघाचा ५८ धावांनी पराभव केला. गुजरात संघाचा हा सलग चौथा विजय आहे. 

राजस्थान रॉयल्स संघाच्या डावाची सुरुवात खराब झाली. अर्शद खान याने डावाच्या दुसऱ्या षटकात यशस्वी जयस्वाल याला अवघ्या ६ धावांवर बाद करुन त्यांना पहिला धक्का दिला. त्यानंतर नितीश राणा (१) लवकर तंबूत परतला. सिराज याने त्याला बाद करुन खळबळ उडवली. त्यानंतर रियान पराग (२६) व ध्रुव जुरेल (५) हे आक्रमक फटकेबाजीच्या प्रयत्नात बाद झाले. त्यामुळे राजस्थान रॉयल्स संघाची स्थिती ८ षटकात चार बाद ६८ अशी बिकट झाली. रियान पराग मोठा डाव खेळेल असे वाटत होते. परंतु, १४ चेंडूत तीन षटकार व एक चौकार मारुन पराग २६ धावांची दमदार खेळी करुन परतला. 

संजू सॅमसन व शिमरॉन हेटमायर या धमाकेदार फलंदाजांकडून चाहत्यांना अपेक्षा होत्या. प्रसिद्ध कृष्णाने संजू सॅमसनला ४१ धावांवर बाद करुन मोठा अडथळा दूर केला. संजूने २८ चेंडूत चार चौकार व दोन षटकार मारले. संजू-हेटमायर जोडीने ४८ धावांची भागीदारी रचली होती. हेटमायर सर्वाधिक ५२ धावांचे योगदान देऊन बाद झाला. त्याने ३२ चेंडूंचा सामना करताना चार चौकार व तीन षटकार मारले. शुभम दुबे (१), जोफ्रा आर्चर (४), तुषार देशपांडे (३), महेश तीक्षणा (५) हे तळाचे फलंदाज झटपट बाद झाले. राजस्थान रॉयल्स संघाचा डाव १९.२ षटकात १५९ धावांत संपुष्टात आला. राजस्थानला ५८ धावांनी पराभव स्वीकारावा लागला. प्रसिद्ध कृष्णाने २४ धावांत तीन विकेट घेतल्या. रशीद खान (२-३७) व साई किशोर (२-२०) यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. 

साई सुदर्शनची शानदार फलंदाजी

प्रथम फलंदाजी करताना गुजरात टायटन्स संघाने २१७ धावसंख्या उभारली. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात साई सुदर्शन गुजरात संघाचा सर्वात यशस्वी फलंदाज ठरला. त्याने ८२ धावांची खेळी खेळली आणि आपल्या संघाला मोठ्या धावसंख्येपर्यंत पोहोचवले. त्याच्याशिवाय जोस बटलर आणि शाहरुख खान यांनीही महत्त्वाच्या खेळी केल्या. पण गुजरातचा कर्णधार शुभमन गिल यावेळी अपयशी ठरला. राजस्थानकडून महेश तीक्षणा आणि तुषार देशपांडे यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या.

या सामन्यात राजस्थान रॉयल्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. राजस्थानलाही चांगली सुरुवात मिळाली कारण शुभमन गिलला जोफ्रा आर्चरने फक्त २ धावांवर क्लीन बोल्ड केले. त्यानंतर, साई सुदर्शन आणि जोस बटलर यांच्यात ८० धावांची भागीदारी झाली. बटलरने २६ चेंडूत ३६ धावांची खेळी केली. बटलर बाद झाल्यानंतर, शाहरुख खानने जबाबदारी घेतली आणि २० चेंडूत ३६ धावांची तुफानी खेळी केली आणि साई सुदर्शनसोबत ६२ धावांची भागीदारी केली.

शेवटच्या ८ षटकांत १०७ धावा
एकेकाळी गुजरातने १२ षटकांत ११० धावा केल्या होत्या आणि त्यानंतर २०० धावसंख्येपर्यंत पोहोचणे खूप कठीण वाटत होते. १२ व्या षटकापर्यंत साई सुदर्शनने आपले अर्धशतक पूर्ण केले होते. त्यानंतर सुदर्शनने १७ चेंडूत २८ धावा काढल्या आणि बाद झाला, पण गुजरातला मोठ्या धावसंख्येपर्यंत पोहोचवण्यात शाहरुख खानने मोठी भूमिका बजावली. त्याने २० चेंडूंत ४ चौकार आणि २ षटकारांसह ३६ धावा केल्या.

गुजरातसाठी सहसा फिनिशरची भूमिका बजावणारा राहुल तेवतिया हा शेवटच्या षटकांमध्ये चमकला. तेवतियाने फक्त १२ चेंडूत २४ धावा केल्या आणि यादरम्यान त्याने २ षटकार आणि २ चौकारही मारले. तुषार देशपांडे आणि महेश तीक्षणाने प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. दरम्यान, जोफ्रा आर्चर आणि संदीप शर्मा यांनीही प्रत्येकी एक विकेट घेतली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *