
अहमदाबाद ः आयपीएल स्पर्धेत राजस्थान संघाला पराभवा पाठोपाठ मोठा आर्थिक दंड बसला आहे. कर्णधार संजू सॅमसनसह संघातील सर्व खेळाडूंना आर्थिक दंडाची रक्कम भरावी लागणार आहे.
राजस्थान रॉयल्स संघाला गुजरात टायटन्सविरुद्ध ५८ धावांनी दारुण पराभव पत्करावा लागला. या सामन्यात राजस्थानच्या गोलंदाजांनी भरपूर धावा दिल्या. त्यानंतर फलंदाज वाईटरित्या फ्लॉप झाले. प्रथम फलंदाजी करताना गुजरातने २१७ धावांचा मोठा स्कोअर केला. यानंतर, लक्ष्याचा पाठलाग करताना राजस्थानचा संघ फक्त १५९ धावांवर ऑलआउट झाला. आता सामना गमावल्यानंतर बीसीसीआयने राजस्थान रॉयल्स संघावर कारवाई केली आहे. कर्णधार संजू सॅमसनला स्लो ओव्हर रेटमुळे दंड ठोठावण्यात आला आहे.
सर्व खेळाडूंना दंड
इंडियन प्रीमियर लीगच्या प्रेस रिलीज नुसार गुजरात टायटन्स विरुद्धच्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने स्लो ओव्हर रेट कायम ठेवला. आयपीएलच्या आचारसंहितेच्या कलम २.२२ अंतर्गत चालू हंगामात त्याच्या संघाचा हा दुसरा गुन्हा आहे, जो किमान ओव्हर-रेट गुन्ह्याशी संबंधित आहे. या कारणास्तव संघाचा कर्णधार संजू सॅमसनवर २४ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. उर्वरित प्लेइंग इलेव्हन खेळाडूंना, ज्यामध्ये प्रभावशाली खेळाडूचा समावेश आहे, ६ लाख रुपये किंवा त्यांच्या संबंधित मॅच फीच्या २५ टक्के, जे कमी असेल ते दंड ठोठावण्यात आला आहे.
संजू सॅमसन बोटाच्या दुखापतीमुळे त्रस्त असताना हंगामातील पहिल्या तीन सामन्यांमध्ये रियान परागने राजस्थान रॉयल्सचे नेतृत्व केले. त्यानंतर, चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध स्लो ओव्हर रेटसाठी परागला २४ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.
राजस्थान रॉयल्स संघाला चालू हंगामात आतापर्यंत चांगली कामगिरी करता आलेली नाही. या हंगामात संघाने पाच सामने खेळले आहेत, त्यापैकी फक्त दोन जिंकले आहेत आणि तीन गमावले आहेत. त्याचा ४ गुणांसह नेट रन रेट उणे ०.७३३ आहे. संघ सातव्या क्रमांकावर आहे.
राजस्थानचे फलंदाज अपयशी
गुजरात टायटन्सविरुद्ध राजस्थान रॉयल्सकडून संजू सॅमसन (४१ धावा) आणि शिमरॉन हेटमायर (५२ धावा) यांनी निश्चितच चांगली फलंदाजी केली, परंतु या दोघांव्यतिरिक्त इतर खेळाडू चांगली कामगिरी करण्यात पूर्णपणे अपयशी ठरले. या कारणास्तव, संघ पूर्ण २० षटकेही खेळू शकला नाही आणि १९.२ षटकांत फक्त १५९ धावांवर सर्वबाद झाला. गोलंदाजीत तुषार देशपांडे महागडा ठरला. त्याने चार षटकांत ५३ धावा दिल्या आणि दोन विकेट घेतल्या.