
स्कॉटलंड संघाचा धक्कादायक विजय
नवी दिल्ली ः आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषक पात्रता स्पर्धा सध्या पाकिस्तानच्या भूमीवर खेळला जात आहे. या स्पर्धेतून दोन संघ २०२५ मध्ये भारतात होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकासाठी पात्र ठरतील. आता महिला एकदिवसीय विश्वचषक पात्रता फेरीत स्कॉटलंड संघाने वेस्ट इंडिजचा ११ धावांनी पराभव करून मोठा अपसेट निर्माण केला. या सामन्यात वेस्ट इंडिज महिला संघाला पराभवाचा सामना करावा लागला असला तरी, त्यांची कर्णधार हेली मॅथ्यूजने तिच्या उत्कृष्ट गोलंदाजीने चार विकेट्स घेतल्या. यानंतर त्याने दमदार फलंदाजी करत शतक झळकावले.
हेली मॅथ्यूजने स्कॉटलंडविरुद्ध चांगली गोलंदाजी केली. तिने १० षटकांत ५६ धावा देत चार महत्त्वाच्या विकेट्स घेतल्या. त्यानंतर, ती वेस्ट इंडिजसाठी ओपनिंग करायला आली आणि तिने सुरुवातीपासूनच चांगली फटकेबाजी केली. या सामन्यात तिने ११३ चेंडूत एकूण ११४ धावा केल्या, ज्यात १४ चौकारांचा समावेश होता. सामन्यात एका वेळी स्ट्रेन समस्येमुळे ती रिटायरहर्ट झाली. त्यानंतर, जेव्हा वेस्ट इंडिज संघाने फक्त २०३ धावांवर ९ विकेट गमावल्या, तेव्हा ती पुन्हा फलंदाजीला आली पण संघाला विजय मिळवून देऊ शकली नाही.
हेली मॅथ्यूजने रचला नवा इतिहास
महिला एकदिवसीय क्रिकेटमध्ये एकाच सामन्यात कर्णधार म्हणून शतक झळकावणारी आणि गोलंदाजी करताना चार विकेट्स घेणारी हेली मॅथ्यूज पहिली कर्णधार ठरली. त्याने त्याच्या उत्कृष्ट कामगिरीने हा मोठा विश्वविक्रम रचला आहे. तिच्या आधी, महिला एकदिवसीय क्रिकेटमध्ये कोणत्याही कर्णधाराला हे करता आले नव्हते.
वेस्ट इंडिज महिला संघाची कामगिरी खराब
वेस्ट इंडिज महिला संघाकडून जयदा जेम्सने ४५ धावा आणि हेली मॅथ्यूजने ११४ धावा केल्या. या दोन खेळाडूंव्यतिरिक्त इतर कोणत्याही फलंदाजाला चांगली कामगिरी करता आली नाही. यामुळे संपूर्ण संघ फक्त २३३ धावांवर बाद झाला आणि संघाला पराभवाचा सामना करावा लागला. स्कॉटलंड संघाकडून कॅथरीन फ्रेझरने सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या. स्कॉटलंड संघाकडून सारा ब्राइसने अर्धशतक झळकावत ५५ धावा केल्या. त्याच्याशिवाय, मॅकॉलने सर्वाधिक ४५ धावांचे योगदान दिले. डार्सी कार्टरने २५ धावांचे योगदान दिले. या खेळाडूंमुळेच स्कॉटलंडने २४४ धावा केल्या.