
मुंबई ः सुप्रीमो चषक गेली ११ वर्षे जोमात सुरू ठेवणे आणि त्याचे वैभव वर्षानुवर्ष वाढवत ठेवणे ही सोपी गोष्ट नाही. सुप्रीमो चषक म्हणजे एक झंझावात आहे, असे गौरवोद्गार शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सुप्रीमो चषक स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यात काढले.
या वेळी त्यांनी हलक्याफुलक्या शैलीत राजकारण आणि क्रिकेट यांची तुलना करत भाष्य केले. आज आयपीएल दोन्ही कडे आहे..राजकारणात आणि क्रिकेटमध्ये. कोणत्या पक्षात कोण आहे हेच समजेनासं झालं आहे. क्रिकेटमध्ये तरी मनोरंजन होतं, पण राजकारणात काय चाललंय हे सगळ्यांना माहिती आहे, असा टोला त्यांनी लगावला.
उद्धव ठाकरे यांनी सुप्रीमो चषकाच्या व्याप्तीचेही कौतुक केले. ही स्पर्धा आता केवळ महाराष्ट्रापुरती राहिलेली नाही. देशभरातील विविध राज्यांतील संघ यात सहभागी होत आहेत. ही स्पर्धा देशभरात पाहिली जाते हे अत्यंत अभिमानास्पद आहे,” असे ते म्हणाले. या स्पर्धेचा अंतिम सामना ब्रेबॉर्न स्टेडियम किंवा वानखेडे स्टेडियमवरच होणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच एक अंतिम सामना दिल्लीतही व्हावा अशी मागणीही त्यांनी आयोजकांकडे केली.
टेनिस क्रिकेटच्या ‘वर्ल्डकप’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुप्रिमो चषक क्रिकेट स्पर्धेचा भव्य शुभारंभ सांताक्रूज येथील एअर इंडिया मैदानावर पार पडला. या भव्य सोहळ्याचे उद्घाटन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उत्साहात झाले.
या प्रसंगी शिवसेना नेते आमदार ॲड अनिल परब, आमदार संजय पोतनिस, क्रिकेटपटू प्रवीण आंब्रे, अन्य मान्यवर उपस्थित होते. यंदाच्या स्पर्धेचे हे ११वे वर्ष असून, देशभरातील अव्वल १६ संघ या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत सहभागी झाले आहेत. यंदा स्पर्धेत दिल्ली, कर्नाटक, गुजरात, मध्य प्रदेश, कोलकाता, गोवा, केरळ, राजकोट येथील नामांकित संघ सहभागी झाले असून, कर्नाटकच्या एफ एम हॉस्पेट संघातून श्रीलंकेच्या क्रिकेटपटूचा सहभाग विशेष आकर्षण ठरत आहे.
या स्पर्धेतील विजेत्या संघाला १२ लाख रुपये रोख, संघातील प्रत्येक खेळाडूला मोटारसायकल, तर ‘मॅन ऑफ द सिरीज’ खेळाडूला कार देण्यात येणार आहे. उपविजेत्या संघासाठी १० लाखांचे बक्षीस, तर उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाजासाठीही बाईक्स ठेवण्यात आल्या आहेत.