दिल्लीच्या राहुलने आरसीबीचा विजय हिरावला 

  • By admin
  • April 10, 2025
  • 0
  • 9 Views
Spread the love

राहुल-स्टब्सची शतकी भागीदारी निर्णायक, दिल्लीचा सलग चौथा विजय

बंगळुरू : अनुभवी केएल राहुल (नाबाद ९३) आणि स्ट्रिस्टन स्टब्स (नाबाद ३८) यांच्या नाबाद १११ धावांच्या भागीदारीच्या बळावर दिल्ली कॅपिटल्स संघाने आरसीबी संघावर सहा विकेट राखून विजय मिळवला. या विजयासह दिल्लीने आपली विजयी मोहीम कायम ठेवत सलग चौथा विजय नोंदवला आहे. 

दिल्ली कॅपिटल्स संघासमोर विजयासाठी १६४ धावांचे लक्ष्य होते. खेळपट्टी गोलंदाजांना साह्य करणारी असल्याने या धावसंख्येचा पाठलाग करणे सोपे नव्हते. फाफ डु प्लेसिस (२), जेक फ्रेझर मॅकगर्क (७), अभिषेक पोरेल (७) हे आघाडीचे  आक्रमक फलंदाज स्वस्तात बाद झाले. विशेष म्हणजे हे तिघेही जवळपास एकसारखा फटका मारुन तंबूत परतले. कर्णधार अक्षर पटेल दोन चौकारांसह १५ धावांचे योगदान देऊन बाद झाला. त्यावेळी धावसंख्या चार बाद ५८ अशी बिकट झालेली होती. 

केएल राहुल याने धमाकेदार फलंदाजी करत संघाला विजयपथावर आणले.  डावातील १५व्या षटकात राहुलने जोश हेझलवूड याचा खरपूस समाचार घेत २२ धावा फटकावल्या. या षटकानंतर सामना दिल्ली संघाकडे झुकला. राहुल आणि स्ट्रिस्टन स्टब्स या जोडीने पाचव्या विकेटसाठी ५५ चेंडूत नाबाद १११ धावांची भागीदारी करुन आरसीबीच्या पराभवावर शिक्कामोर्तब केले. राहुलने अवघ्या ५३ चेंडूत नाबाद ९३ धावांची वादळी खेळी केली. त्याने सहा षटकार व सात चौकार मारले. स्टब्सने २३ चेंडूत नाबाद ३८ धावा फटकावत सुरेख साथ दिली. त्याने  चार चौकार व एक षटकार मारला. भुवनेश्वर कुमारने २६ धावांत दोन गडी बाद केले. 

टिम डेव्हिडने सावरला डाव 
आयपीएलच्या २४ व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने दिल्ली कॅपिटल्सना विजयासाठी १६४ धावांचे लक्ष्य दिले. या सामन्यात दिल्लीच्या गोलंदाजांनी कहर केला. आरसीबीकडून फलंदाजी करताना, टिम डेव्हिडने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. आरसीबीकडून फिलिप साल्ट आणि विराट कोहली यांनीही चांगली फलंदाजी केली. कुलदीप यादव आणि विप्रज निगम यांनी प्रत्येकी २ बळी घेतले.

आरसीबी संघाकडून आठव्या क्रमांकावर टिम डेव्हिड फलंदाजीला आला. डेव्हिडने डाव सावरताना २० चेंडूत नाबाद ३७ धावा केल्या. यादरम्यान डेव्हिडने ४ षटकार आणि २ चौकार मारले. त्याने शेवटच्या षटकात दोन षटकार आणि एक चौकार मारला. हे षटक दिल्लीकडून मुकेश कुमार याने टाकले. आरसीबीने २० षटकांत ७ गडी गमावून १६३ धावा केल्या.

फिलिप साल्ट आणि विराट कोहली यांनी आरसीबीला चांगली सुरुवात करून दिली. सॉल्टने १७ चेंडूत ३७ धावा केल्या. यादरम्यान त्याने ४ चौकार आणि ३ षटकार मारले. पण यानंतर तो धावबाद झाला. विराटने १४ चेंडूंचा सामना करत २२ धावा केल्या. कोहलीच्या खेळीत २ चौकार आणि १ षटकार होता.

मधली फळी गडगडली
सलामीवीरांनंतर मधल्या फळीतील फलंदाजांना काही खास कामगिरी करता आली नाही. लियाम लिव्हिंगस्टोन ४ धावा काढून पॅव्हेलियनमध्ये परतला. मोहित शर्माने त्याला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. जितेश शर्मा फक्त ३ धावा करून बाद झाला. क्रुणाल पांड्या १८ चेंडूत १८ धावा काढून बाद झाला. कर्णधार रजत पाटीदारने २५ धावा केल्या.

दिल्लीच्या फिरकीपटूंची घातक गोलंदाजी
कुलदीप यादवने घातक गोलंदाजी केली. त्याने ४ षटकांत १७ धावा देत २ बळी घेतले. कुलदीपने जितेश आणि कर्णधार पाटीदार यांचे बळी घेतले. विप्राज निगमने ४ षटकांत १८ धावा देत २ बळी घेतले. त्याने कृणाल आणि विराट कोहलीला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. वेगवान गोलंदाज मोहित शर्माने एक विकेट घेतली. त्याने २ षटकांत १० धावा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *