
शालेय म्युझिकल चेअर्स स्पर्धा
निफाड ः आंतर शालेय म्युझिकल चेअर्स स्पर्धेत निफाडच्या सरस्वती विद्यालय खेळाडूंनी चमकदार कामगिरी बजावली. या कामगिरीमुळे सरस्वती विद्यालयाच्या खेळाडूंची विभागीय शालेय म्युझिकल चेअर्स स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
क्रीडा व युवक सेवा संचानालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक द्वारा आयोजित व नाशिक जिल्हा म्युझिकल चेअर्स असोसिएशन नाशिक यांच्या सहकार्याने निफाड येथे घेण्यात आलेल्या १९ वर्षांखालील म्युझिकल शेअर स्पर्धा सरस्वती विद्यालयाच्या सभागृहात उत्साहात संपन्न झाली.
या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी सरस्वती विद्यालयाच्या मुख्याध्यापिका ज्योती बागडे, क्रीडा अधिकारी संदीप ढाकणे, जिल्हा संघटक मोसिम मणियार व विलास गायकवाड हे उपस्थित होते. जिल्हा संघटक विलास गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना म्युझिकल चेअर्स या खेळाची माहिती व नियम सांगितले. या जिल्हास्तरीय म्युझिकल चेअर स्पर्धेमध्ये विविध शाळेतील खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. त्यामध्ये निफाड येथील सरस्वती विद्यालयातील विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट खेळ करत घवघवीत यश संपादन केले.
या स्पर्धेत आराध्या सालमुठे, श्रद्धा मोगल, वेदिका कुशारे, अनुष्का कुशारे, स्वानंदी बिदे, तनिष्का निकम, श्रेयसी माळी, कृतिका मोगल, मोक्षदा जाधव, धनश्री पातळे या खेळाडूंनी जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये सुवर्णपदक मिळवले. या सर्व खेळाडूंची शालेय विभागीय स्तरावर निवड झाली. या निवडीबद्दल सरस्वती विद्यालयाचे चेअरमन नंदलाल चोरडिया, शाळेच्या मुख्याध्यापिका ज्योती बागडे, क्रीडा मार्गदर्शक सोनाली निकम यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. क्रीडा शिक्षक विलास गायकवाड यांचे या खेळाडूंना मार्गदर्शन लाभत आहे.