
पहिल्यांदा सहभाग घेत पटकावले उपविजेतेपद
बीड : पुणे येथे झालेल्या राज्यस्तरीय रग्बी अजिंक्यपद स्पर्धेत बीड महिला रग्बी संघाने पहिल्यांदा सहभाग घेत अंतिम फेरी गाठून एक नवा इतिहास रचला. बीड महिला संघाने शानदार कामगिरी नोंदवत उपविजेतेपद संपादन केले. अशी कामगिरी करणारा बीडचा महिला संघ पहिला ठरला आहे.
महाराष्ट्र रग्बी असोसिएशन आणि पुणे रग्बी असोसिएशन यांचे संयुक्त विद्यमाने १२व्या राज्यस्तरीय महिला वरिष्ठ गटाच्या रग्बी स्पर्धेचे आयोजन श्री शिवछत्रपती क्रीडापीठ महाळुंगे, बालेवाडी पुणे येथे करण्यात आले होते. या स्पर्धेत बीड जिल्हा रग्बी असोसिएशनच्या महिला संघाने पहिल्यांदा सहभाग नोंदवला होता. आजपर्यंतच्या रग्बी स्पर्धेच्या इतिहासात महिला रग्बी स्पर्धेमध्ये प्रथमच सहभागी झालेला कोणताही संघ कधीही अंतिम फेरी गाठू शकला नाही. राज्यस्तरीय अजिंक्यपद स्पर्धेच्या इतिहासामध्ये अशी कामगिरी करणारा हा बीडचा संघ पहिला ठरला आहे. या राज्यस्तरीय स्पर्धेत बीड संघाने प्रथम साखळी फेरीमध्ये तुल्यबळ अशा सातारा संघास १९-० गुणांनी आणि धुळे संघाविरुद्ध १९-० गुणांनी विजयी होत उप उपांत्य फेरीत प्रवेश केला.
उपांत्य पूर्व फेरीचा सामना मागील वर्षाच्या ४ क्रमांकाचा विजेता असलेल्या धाराशिव संघास १२-५ गुणांनी नमवत उपांत्य फेरी मध्ये प्रवेश केला. त्यानंतर उपांत्य फेरीत राज्यात जो नेहमी अनुभवी आणि तरबेज खेळाडूंचा संघ म्हणून ओळखला जातो त्या ठाणे संघास ७-५ गुणांनी नमवत दिमाखदारपणे अंतिम सामन्यात प्रवेश निश्चित केला.
बीड जिल्हा रग्बी असोसिएशनच्यावतीने आजपर्यंत वरिष्ठ गट महिला प्रकारात ही अत्युच्च कामगिरीची नोंद झाली आहे. अंतिम सामना मागील ६ वर्षापासून प्रथम क्रमांकावर असलेला तुल्यबळ, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा भरणा असलेल्या कोल्हापूर संघा बरोबर झाली. या सामन्यात बीड संघातील नवख्या मुलींनी त्यांचे सर्वस्व पणाला लावून जिद्दीने लढत दिली, परंतु पराभव पत्करावा लागल्याने बीड संघास उपिजेतेपदावर समाधान मानावे लागले. बीड संघाने महिला गटात नवीन इतिहास रचला आहे.
बीडचा महिला रग्बी संघ मोरया क्रीडा मंडळ या ठिकाणी नियमित सराव करतो. या संघाला मुख्य प्रशिक्षक नितीन येळवे, अशोक चौरे, शोएब खाटीक यांचे मार्गदर्शन लाभत आहे. बीड जिल्हा रब्बी असोसिएशनच्या या यशस्वी संघात आदिती सखाराम लोंढे, कीर्ती किरण जाधव, राधा हरिदास दिवे, तृष्णा राहुल कोकाटे, दीपाली दिलीप ताटे, पूजा दत्ता करडेल, शिवानी उत्तम शेळके, कोमल उमेश लोंढे, कोमल भीमराव नागरगोजे, अस्मिता दिगंबर सातव, मोरे निकिता गणेश, तृप्ती ज्ञानेश्वर जाधव या खेळाडूंचा समावेश होता. सर्व खेळाडूंनी मेहनतीने हे पदक जिंकले आहे. संघातील सर्व खेळाडूंना मोरया क्रीडा मंडळ बीडचे संस्थापक अध्यक्ष, राष्ट्रीय रग्बी प्रशिक्षक तसेच बीड जिल्हा रग्बी मुख्य प्रशिक्षक नितीन येळवे, कारागृह पोलिस (नंदुरबार) रग्बी प्रशिक्षक शोएब खाटीक, तसेच मोरया क्रीडा मंडळाचे सचिव अशोक चौरे यांनी अतिशय उत्तम प्रशिक्षित केलेले आहे.
जिल्हा संघाच्या रौप्य पदक विजेत्या कामगिरीबद्दल बीड जिल्हा रग्बी फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष इसाक शेख, सचिव महेश घुले, उपाध्यक्ष रमेश सानप, कोषाध्यक्ष हरिभाऊ बांगर, कार्याध्यक्ष नितीन येळवे तसेच प्रशिक्षक शोएब खाटीक, प्रशिक्षक अशोक चौरे, मार्गदर्शक भगवानराव बागलाने, शिवराज देवगुडे, साईनाथ राजे (जालना), अदनान शेख, आंतरराष्ट्रीय खेळाडू यश जाधव, मंडळाचे सर्व राष्ट्रीय, राज्यस्तरीय रग्बी खेळाडू, राष्ट्रीय पंच संभाजी गिरे, वेदांत डावकर, इतर सर्व पदाधिकारी आणि समस्त मोरया क्रीडा मंडळ परिवार बीड आदींनी शुभेच्छा दिल्या.