
नागपूर ः आयपीएल स्पर्धेचा हंगाम संपल्यानंतर विदर्भ क्रिकेट असोसिएशनतर्फे लगेच जामठा येथील प्रतिष्ठित व्हीसीए स्टेडियमवर विदर्भ प्रो टी २० लीग स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे.
विदर्भ क्रिकेट असोसिएशनतर्फे प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या विदर्भ प्रो टी २० लीग स्पर्धेत एकूण सहा पुरुष फ्रँचायझी संघ आणि तीन महिला फ्रँचायझी संघ सहभागी होणार आहेत. पहिल्या विदर्भ प्रो टी २० आयोजित करण्यासाठी व्हीसीए सज्ज झाले आहे.
या संदर्भात व्हीसीए लीगच्या एका फ्रँचायझी संघाचे मालकी हक्क मिळवण्यासाठी इच्छुक असलेल्या विविध पक्षांकडून स्वारस्य व्यक्त करण्यासाठी (ईओआय) आमंत्रित करण्यात येत आहे. ईओआय फॉर्म व्हीसीएच्या अधिकृत वेबसाईट www.vca.co.in वर अपलोड करण्यात आला आहे. लीग डेक, ईओआय फॉर्म पाहण्यासाठी आणि कोणत्याही प्रश्नांसाठी संबंधित vpti@vca.co.in वर देखील लिहू शकतात.
या स्पर्धेत ज्यांना संघ खरेदी करण्याची इच्छा असेल त्यांनी १७ एप्रिल रोजी संध्याकाळी पाच वाजेपर्यंत योग्यरित्या भरलेला ईओआय सादर करावा. कोणतेही कारण न देता कोणताही प्रस्ताव स्वीकारण्याचा किंवा नाकारण्याचा अधिकार व्हीसीए राखून ठेवत आहे असे व्हीसीएने म्हटले आहे.