
राज्य स्पर्धेत खेळाडू चांगली कामगिरी करतील ः दीपक निकम
नाशिक ः नाशिक जिल्हा लॅक्रॉस असोसिएशनच्या वतीने आयोजित जिल्हा निवड चाचणी मोठ्या उत्साहाने पार पडली. या निवड चाचणीमध्ये सब ज्युनिअर, ज्युनिअर आणि सीनियर या तीन गटांचा समावेश होता.
जागतिक ऑलिम्पिक संघटनेने लॅक्रॉस या खेळाचा समावेश २०२८ मध्ये लॉस एंजलिस, कॅलिफोर्निया युनायटेड स्टेट्स येथे होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेत केला आहे. खेळाडूंना या खेळाची सखोल माहिती मिळावी यासाठी नाशिक येथे गेल्या पाच-सहा महिन्यांपासून प्रयत्न केले जात आहेत. या खेळामध्ये जास्तीत जास्त खेळाडूंनी सहभागी व्हावे, खेळाडूना योग्य संधी मिळावी यासाठी लॅक्रॉस असोसिएशन ऑफ नाशिकच्या वतीने या खेळाचे साहित्य खेळाडूंना उपलब्ध करून दिले आहे.
याचाच एक भाग म्हणून विभागीय क्रीडा संकुल येथे जिल्हा संघांची निवड करण्यासाठी निवड चाचणी आयोजित करण्यात आली होती. यामध्ये नाशिक जिल्ह्यातील १०६ खेळाडूंनी सहभाग घेतला. या निवड चाचणीतून प्रत्येक गटांसाठी संभाव्य १६-१६ खेळाडूंचे प्राथमिक निवड करण्यात आली आहे.
या निवड झालेल्या खेळाडूंचे तीन दिवस सराव शिबिर आयोजित करण्यात आले आहे. त्यानंतर अंतिम निवड झालेले खेळाडू पुणे येथे १५ आणि १६ एप्रिल दरम्यान आयोजित महाराष्ट्र राज्य लॅक्रॉस अजिंक्यपद स्पर्धेत नाशिक जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करतील. मागील वर्षी डिसेंबर,२०२४ मध्ये सेलू (परभणी) येथे झालेल्या राज्य स्पर्धेमध्ये नाशिक जिल्ह्याच्या वरिष्ठ गट पुरुषाच्या संघाने प्रथम क्रमांक पटकाविला होता. यावेळी देखील नाशिक जिल्ह्याचे वर्चस्व कायम राहावे याकरिता प्रयत्न केले जात आहेत.
या निवड चाचणी दरम्यान क्रीडा संघटक चंद्रकांत बनकर, अनिल गायकवाड, अशोक कदम, योगेश पाटील, आनंद खरे, दीपक निकम आदींनी भेट देवून खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. या निवड चाचणीसाठी अविनाश वाघ, राष्ट्रीय खेळाडू रुपेश महाजन, शैलेश रकिबे, सतीश बोरा, शशिभूषण सिंह, स्वप्नील कातकाडे, अंकुश सिंह यांनी परिश्रम घेतले.