
जालना ः भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंती निमित्ताने जिल्हा प्रशासन, सर्व शैक्षणिक संस्था, विद्यापिठे, एनएसएस, एनसीसी, एनवायके व इतर यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात रविवारी (१३ एप्रिल) सकाळी ७.३० वाजता जयभीम पदयात्रेचे आयोजन होणार आहे.
जालना शहरात जिल्हा प्रशासन, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नेहरू युवा केंद्र, जिल्हा परिषद, विविध क्रीडा संघटना, मंडळे यांच्या विद्यमाने १३ एप्रिल रोजी सकाळी ७.३० वाजता डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा (नुतन वसाहत) येथून पदयात्रेला सुरुवात होणार आहे. सदर पदयात्रा शनि मंदीर-गांधी चमन-डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा (मस्तगड) यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून पूर्ण करण्यात येणार आहे. या पदयात्रेस जालना जिल्ह्यातील सर्व लोकप्रिय लोकप्रतिनिधी, सर्व विभागाचे विभाग प्रमुख यांची उपस्थिती राहणार आहे.
सर्व शाळा, महाविद्यालयांनी आपल्या विद्यार्थ्यांना शिक्षकांसह, एनसीसी, एनएसएस, स्काऊट, गाईडस विद्यार्थी यांना पदयात्रेत सहभागी करावेत तसेच सर्व क्रीडा संघटना पदाधिकारी व खेळाडू यांनी पदयात्रेत मोठ्या संख्येने सहभाग घ्यावा असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा प्रशासन, जिल्हा शिक्षण विभाग, जिल्हा परिषद, जालना यांच्यावतीने करण्यात येत आहे.