
१ हजार चौकारांचा टप्पा गाठला, असा पराक्रम करणारा पहिला फलंदाज
बंगळुरू ः आरसीबी संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली याने आयपीएल २०२५ मध्ये इतिहास रचला आहे. दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध त्याने २२ धावांची खेळी केली. या वेळी, कोहलीने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून फलंदाजी करताना दोन षटकार आणि एक चौकार मारला. यामुळे विराटने आयपीएलमध्ये १००० चौकारांचा टप्पा गाठला. आयपीएलच्या इतिहासात अशी कामगिरी करणारा तो पहिलाच खेळाडू आहे.
विराट कोहलीने आयपीएल मध्ये फक्त आरसीबीकडून सामने खेळले आहेत. २००८ पासून त्याने २४८ सामने खेळले आहेत. या काळात त्याने ७२१ चौकार आणि २७९ षटकार मारले आहेत. अशाप्रकारे विराटने एक हजार चौकार पूर्ण केले आहेत. अशी कामगिरी करणारा तो इतिहासातील पहिला खेळाडू आहे. या यादीत शिखर धवन दुसऱ्या स्थानावर आहे. धवनने आयपीएलमध्ये ९२० चौकार मारले आहेत.
आयपीएलमध्ये सर्वाधिक चौकार मारणाऱ्या टॉप पाच खेळाडूंच्या यादीत तीन भारतीय खेळाडू आहेत. कोहली आणि धवनसोबत रोहित शर्माचाही या यादीत समावेश आहे. हे वृत्त लिहिण्याच्या वेळेपर्यंत, रोहितने आयपीएलमध्ये २५६ सामने खेळले आहेत. या काळात त्याने २८२ षटकार आणि ६०३ चौकार मारले आहेत. रोहितने एकूण ८८५ चौकार मारले आहेत. तो एकूण यादीत चौथ्या क्रमांकावर आहे. डेव्हिड वॉर्नर तिसऱ्या क्रमांकावर आहे. वॉर्नरने ८९९ चौकार मारले आहेत. ख्रिस गेल पाचव्या क्रमांकावर आहे. गेलने ७६१ चौकार मारले आहेत.
कोहली अव्वल स्थानावर
स्पर्धेत सर्वाधिक धावा काढण्याच्या बाबतीत विराट अव्वल स्थानावर आहे. विराटने ८१९० धावा केल्या आहेत. या काळात त्याने ८ शतके आणि ५७ अर्धशतके झळकावली आहेत. कोहलीचा सर्वोत्तम स्कोअर ११३ धावा आहे. सर्वाधिक धावा काढण्याच्या बाबतीत धवन दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने ६७६९ धावा केल्या आहेत. रोहित ६६६६ धावांसह तिसऱ्या स्थानावर आहे.