
शहीद भगतसिंग औद्योगिक क्रिकेट स्पर्धा ः ऋषिकेश निकम, इरफान पठाण, कैसर शेख सामनावीर

छत्रपती संभाजीनगर ः ३२व्या शहीद भगतसिंग करंडक औद्योगिक टी २० क्रिकेट स्पर्धेत कॅनरा बँक, लॅब टेक्निशियन आणि छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका या संघांनी शानदार विजयांसह आगेकूच कायम ठेवली आहे. या लढतींमध्ये ऋषिकेश निकम, इरफान पठाण व कैसर शेख यांनी भंडारी इलेक्ट्रिकल्स सामनावीर पुरस्कार संपादन केला आहे.
गरवारे क्रिकेट स्टेडियमवर ही स्पर्धा होत आहे. कॉस्मो फिल्म प्रायोजित व शहीद भगतसिंह क्रीडा व सांस्कृतिक मंडळ आयोजित या स्पर्धेत शुक्रवारी झालेल्या पहिल्या झालेल्या सामन्यात कॅनरा बँक संघाने एशियन हॉस्पिटल संघावर १०१ धावांनी विजय नोंदवला. दुसऱ्या सामन्यात लॅब टेक्निशियन संघाने बांधकाम विभाग संघावर १० गडी राखून विजय संपादन केला. तिसऱ्या सामन्यात अतिशय चुरशीच्या झालेल्या लढतीत धावांचा पाठलाग करताना छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका संघाने प्रिसिशन पॉवर संघावर सहा गडी राखून विजय संपादन केला.
पहिला सामना कॅनरा बँक व एशियन हॉस्पिटल या संघा दरम्यान खेळविण्यात आला. एशियन हॉस्पिटल संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. कॅनरा बँक संघातर्फे प्रथम फलंदाजी करताना ऋषिकेश निकम याने अप्रतिम खेळी करताना केवळ ४९ चेंडूत ३ उत्तुंग षटकार व १३ चौकारांसह ९३ धावांची धमाकेदार खेळी केली. तसेच दुर्गेश साळुंखे याने २७ चेंडूत १ षटकार व ३ चौकारांसह ४२ धावा, आकाश बोराडे याने २३ चेंडूत ६ चौकारांसह ३७ धावा तर प्रणित दीक्षित याने ११ चेंडूत १ चौकारासह १७ धावांचे योगदान दिले. एशियन हॉस्पिटल संघातर्फे गोलंदाजी करताना अखिलेश त्रिभुवन याने २७ धावात २ गडी तर झिशान शेख, हर्षवर्धन त्रिभुवन, याहीया देशमुख यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला.
प्रत्युत्तरात एशियन हॉस्पिटल संघ १९ षटकात सर्वबाद ११२ धावा करू शकला. यामध्ये मोहम्मद उबेद याने ३१ चेंडूत ५ चौकारांसह ३६ धावा, अनिरुद्ध त्रिभुवन याने २६ चेंडूत २ चौकारांसह २१ धावा, शेख झिशान याने १९ चेंडूत एक चौकारासह १७ धावा तर याहीया देशमुख याने १७ चेंडूत १चौकारासह १० धावांचे योगदान दिले. कॅनरा बँक संघातर्फे गोलंदाजी करताना सुनील भगत याने केवळ ७ धावात ४ महत्त्वपूर्ण गडी बाद केले. तर बाळू चौतमल याने २० धावात ३ गडी, आकाश बोराडे याने २९ धावात २ गडी तर प्रणित दीक्षित याने ६ धावात १ गडी बाद केला.

दुसरा सामना बांधकाम विभाग व लॅब टेक्निशियन या संघादरम्यान खेळविण्यात आला. बांधकाम विभाग संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकात ७ बाद १२८ धावा केल्या. यामध्ये राजेश ढोरमारे याने सर्वाधिक ५० चेंडूत ३ उत्तुंग षटकार व १० चौकारांसह नाबाद ७८ धावा, तर कर्णधार रवींद्र तोंडे याने ११ चेंडूत ३ चौकारांसह १५ धावांचे योगदान दिले. लॅब टेक्निशियन संघातर्फे गोलंदाजी करताना प्रमोद बहुरे याने ३२ धावात ३ गडी तर उमेश पवार याने १७ धावात १ गडी बाद केला. तर ३ फलंदाज धावचित झाले.
प्रत्युत्तरात लॅब टेक्निशियन संघाने विजयी लक्ष एकही गडी न गमावता पूर्ण केले. यामध्ये इरफान पठाण याने ४२ चेंडूत २ उत्तुंग षटकार व १० चौकारांसह ७२ धावा, व अभिषेक चव्हाण याने ५० चेंडूत ८ चौकारांसह ५० धावांचे योगदान दिले. बांधकाम विभाग संघाला लॅब टेक्निशियन संघाचा एकही गडी बाद करता आला नाही.

तिसरा सामना प्रिसिशियन पॉवर व छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका या संघांदरम्यान खेळविण्यात आला. प्रिसिशियन पॉवर संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकात ६ बाद १८० धावा केल्या. यामध्ये ओमकार बिरोटे याने ५७ चेंडूत ३ षटकार व १३ चौकारांसह ९६ धावा केल्या. विशाल शिंदे याने २१ चेंडूत १ षटकार व ४ चौकारांसह ३० धावा, तर भरत काजळकर व प्रदीप वाघ यांनी प्रत्येकी १६ धावांचे योगदान दिले. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका संघातर्फे गोलंदाजी करताना लखन दुलगज याने १७ धावांत ३ गडी तर राजेंद्र मस्के व कासैर शेख यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला.
प्रत्युत्तरात छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका संघाने विजयी लक्ष १६ षटकात ४ गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केले. यामध्ये कैसर शेख याने ३० चेंडूत ४ उत्तुंग षटकार व ५ चौकारांसह ६१ धावा, अतुल बोर्डे याने २२ चेंडूत १ षटकार व ७ चौकारांसह ४४ धावा, कुणाल मिसाळ याने ३४ चेंडूत ३ चौकारांसह ४२ धावा तर प्रशांत म्हस्के याने ६ चेंडूत १ षटकार व २ चौकारांसह १५ धावांचे योगदान दिले. प्रिसिशन पॉवर संघातर्फे गोलंदाजी करताना भरत काजळकर याने १६ धावांत २ गडी तर प्रदीप वाघ व रोहन डोंगरे यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला.
या सामन्यांत पंचाची भूमिका अजय देशपांडे, यासेर सिद्दिकी, महेश जहागिरदार, विशाल चव्हाण, सुनील बनसोडे, कमलेश यादव यांनी तर गुणलेखकाची भूमिका किरण भोळे यांनी पार पाडली, असे संयोजन समितीचे सदस्य व शहीद भगतसिंह क्रीडा व सांस्कृतिक मंडळाचे उपाध्यक्ष दामोदर मानकापे यांनी सांगितले.
शनिवारी होणारे सामने
एस टी महामंडळ व जिल्हा वकील युनायटेड (सकाळी ८ वाजता),
महावितरण ‘ब’ आणि इंडियन मेडिकल असोसिएशन (सकाळी ११ वाजता)
शहर पोलीस व डीआयएजीओ (दुपारी २ वाजता)