
मुंबई : वासू परांजपे यांची तल्लख विनोद बुद्धी खरोखरच अलौकिक होती असे भारताचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांनी १३ वर्षांखालील मुलांच्या पहिल्या वासू परांजपे कप स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभात सांगितले.
दादर युनियन, माटुंगा येथे झालेल्या या समारंभात दिलीप वेंगसरकर म्हणाले की, एखादा खेळाडू आपली १०० टक्के कामगिरी करण्यात अपयशी ठरत असेल आणि त्याला प्रोत्साहित करण्याची गरज असेल तेव्हा वासू परांजपे आपल्या तल्लख विनोद बुद्धीने अगदी हसत खेळत त्याला अशा प्रकारे थोडक्यात समजावत की तो खेळाडू थोड्याच कालावधीत कमालीची कामगिरी करताना दिसायचा. अलीकडे प्रशिक्षक युवा खेळाडूंना जोरात ओरडून किंवा रागावून काही गोष्टी समजावताना दिसतात, अशा प्रशिक्षकांना कानपिचक्या देताना तुम्ही छोट्या खेळाडूंना समजावताना तुमच्यातील बुद्धीचा वापर करून सौम्य शब्दात बोलून त्यांच्यातील सर्वोत्तम कामगिरी करून घ्यायला हवी असे वेंगसरकर यांनी सांगितले.
वासूंच्या पत्नी ललिताजी देखील या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित होत्या आणि त्यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिके प्रदान करण्यात आली. दादर युनियन मधील वासू यांचे सहकारी श्रीधर मांडले हे देखील या कार्यक्रमास उपस्थित होते.
दादर युनियन येथे झालेल्या अंतिम फेरीच्या चुरशीच्या लढतीत स्पोर्ट्स फिल्ड क्रिकेट क्लब संघाने पटेल क्रिकेट क्लब संघावर केवळ सात धावांनी सनसनाटी विजय मिळवत स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. स्पोर्ट्स फिल्ड संघाने प्रथम फलंदाजी करताना ३२.४ षटकांत सर्वबाद १४८ धावांचे लक्ष्य उभारले. यात अर्णव शेलार (नाबाद ३७), अमर बी के (३२), विराज जाधव (२३) आणि अरिश खान (१६) यांनी प्रमुख धावा केल्या. पटेल क्रिकेट क्लबच्या आदित्य पांडे (१८/३) आणि अंश गुप्ता (२४/३) यांनी प्रत्येकी तीन बळी तर अनुज सिंग याने १९ धावांत २ बळी मिळविले.
या आव्हानाचा पाठलाग करताना आरव यादव याने ५३ तर शिवम यादव याने नाबाद २८ धावांची खेळी करून त्यांना विजयाची आस दाखविली होती. शेवटच्या षटकांत त्यांना ९ धावांची गरज असताना दुसऱ्या चेंडूवर दारियस मेहता (१५) धावचीत झाला आणि नंतर आलेल्या पांडेला अर्जुन जाधव याने बाद करून संघाला विजयी केले. अर्जुन जाधव याने १६ धावांत २ तर सुरज केवट याने १८ धावांत २ विकेट्स मिळवत संघाचा विजय साकार केला. अंतिम सामन्यातील सर्वोत्तम खेळाडू म्हणून अर्णव शेलार याची निवड करण्यात आली.
स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून पटेल संघाच्या आरव यादवची तर सर्वोत्तम फलंदाज म्हणून न्यू हिंदच्या सिद्धार्थ भोसले यांना गौरविण्यात आले. सर्वोत्तम गोलंदाज म्हणून अनुज सिंग तर सर्वोत्तम क्षेत्ररक्षक म्हणून अद्वैत तिवारी याची निवड करण्यात आली.
संक्षिप्त धावफलक ः स्पोर्ट्स फील्ड क्रिकेट क्लब ः ३२.४ षटकांत सर्वबाद १४८ (विराज जाधव २३, अरिश खान १६, अर्णव शेलार नाबाद ३७, अमर बी के ३२, अनुज सिंग १९ धावांत २ बळी, आदित्य पांडे १८ धावांत ३ बळी, अंश गुप्ता २४ धावांत ३ बळी) विजयी विरुद्ध पटेल सीसी ः ३४.५ षटकांत सर्वबाद १४१ (आरव यादव ५३, दारियस मेहता १५, शिवम यादव नाबाद २८; अर्जुन जाधव १६ धावांत २ बळी, सुरज केवट १८ धावांत २ बळी). सामनावीर ः अर्णव शेलार.