
नाशिक ः यशवंत व्यायाम शाळा येथे हनुमान जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. अध्यक्ष दीपक पाटील यांच्या परिवारातर्फे एक लाख रुपयांची देणगी यावेळी देण्यात आली. सर्व नवे-जुने सभासद आणि हितचिंतक यांची मोठी उपस्थिती या प्रसंगी होती.
नाशिकच्या महात्मा गांधी रोड येथील यशवंत व्यायाम शाळा येथे सालाबादप्रमाणे यावेळीही हनुमान जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. १०८ वर्षामध्ये पदार्पण केलेल्या या संस्थेचे नाशिकच्या सर्वच नागरिकांशी स्नेह संबंध असल्यामुळे सर्व जुने सभासद आणि हितचिंतक आणि नव्या पिढीचे खेळाडू, सभासद असे सर्वच मोठ्या संख्येने उपस्थित होते. विधिवत पूजा करून आणि आरती गाऊन कार्यक्रम साजरा करण्यात आला. त्यानंतर सर्वांना हनुमानाचा प्रसाद आणि दूध वाटप करण्यात आले.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष दीपक पाटील, उपाध्यक्ष रघुनाथ महाबळ, डॉ जयराम महाबळ, डॉ सदाशिव गोसावी, विजय खरोटे, आनंद खरे, प्रशांत गायकवाड, विविध खेळांचे प्रशिक्षक, व्यायामपटू आणि खेळाडू यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. सर्व जुन्या सभासदांची भेट झाल्यामुळे सर्वानी आनंद व्यक्त केला आणि यशवंत व्यायाम शाळेच्या उत्तरोत्तर प्रगती बद्दल समाधान व्यक्त केले.
एक लाखाची देणगी
यशवंत व्यायाम शाळेचे अध्यक्ष दीपक पाटील आणि त्यांच्या कुटुंबियांच्या वतीने एक लाख रुपयांची देणगी व्यायाम शाळेला देण्यात आली. दीपक पाटील यांचे चिरंजीव डॉ स्वप्नील पाटील यांचे दोन वर्षांपूर्वी आकस्मित निधन झाले. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दीपक पाटील यांचे नातू विवान, त्यांची सून पल्लवी आणि पत्नी मंदाताई पाटील यांच्या वतीने ही देणगी संस्थेचे उपाध्यक्ष रघुनाथ महाबळ यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली. मागील वर्षीदेखील मुलांच्या आकस्मित जाण्याचे दुःख असूनही व्यायाम शाळेच्या प्रेमापोटी आणि प्रगतीसाठी दीपक पाटील यांनी मागील वर्षीही एक लाख देणगी दिली होती.
यशवंत व्यायाम शाळेच्या माध्यमातून खेळाडूंना जास्तीत जास्त सुविधा देण्याचा आमचा नेहमीच प्रयत्त्न राहिलेला आहे असे यावेळी अध्यक्ष दीपक पाटील यांनी सांगितले.