जिल्हा वकील, रुचा इंजिनिअरिंग, होमिओपॅथिक डॉक्टर्स संघांची आगेकूच 

  • By admin
  • April 13, 2025
  • 0
  • 13 Views
Spread the love

शहीद भगतसिंह औद्योगिक क्रिकेट स्पर्धा ः निरंजन चव्हाण, सचिन नायर, महेश दसपुते सामनावीर

छत्रपती संभाजीनगर ः ३२व्या शहीद भगतसिंग करंडक औद्योगिक टी २० क्रिकेट स्पर्धेत जिल्हा वकील अ संघ, रुचा इंजिनिअरिंग व होमिओपॅथिक डॉक्टर्स या संघांनी शानदार विजय साकारत आगेकूच कायम ठेवली. निरंजन चव्हाण, सचिन नायर व महेश दसपुते यांनी भंडारी इलेक्ट्रिकल्स सामनावीर पुरस्कार संपादन केला. आनंद गायके याने हॅटट्रिक नोंदवत सामना गाजवला. 

गरवारे क्रीडा संकुलावर सुरू असलेल्या कॉस्मो फिल्म प्रायोजित व शहीद भगतसिंह क्रीडा व सांस्कृतिक मंडळ आयोजित शहीद भगतसिंग क्रिकेट सामन्यांमध्ये रविवारी खेळवल्या गेलेल्या साखळी सामन्याच्या पहिल्या सामन्यात जिल्हा वकील ‘अ’ संघाने वन विभाग संघावर ३३ धावांनी विजय नोंदवला. दुसऱ्या सामन्यात रुचा इंजिनिअरिंग संघाने लॅब टेक्निशियन संघावर ४ गडी राखून विजय मिळवला. तिसऱ्या सामन्यात होमिओपॅथिक डॉक्टर्स संघाने जिल्हा वकील युनायटेड संघावर ३९ धावांनी विजय संपादन केला.

पहिला सामना जिल्हा वकील ‘अ’ आणि वन विभाग या संघादरम्यान खेळवण्यात आला. वन विभाग संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. जिल्हा वकील ‘अ’ संघातर्फे प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकात ९ बाद ११७ धावा केल्या. यामध्ये दिनकर काळे याने २१ चेंडूत २ चौकारांसह २५ धावा, मुकुल जाजू याने १६ चेंडूत ४ चौकारांसह २२ धावा, निरंजन चव्हाण याने १७ चेंडूत २ चौकारांसह २० धावा तर रिझवान शेख याने २१ चेंडूत १ चौकारासह १४ धावांचे योगदान दिले. वनविभाग संघातर्फे गोलंदाजी करताना कर्णधार आनंद गायके याने अप्रतिम व भेदक गोलंदाजी करताना केवळ ८ धावांत ५ महत्त्वपूर्ण गडी बाद केले. ही कामगिरी करताना त्याने हॅटट्रिक नोंदवली. तसेच दिनेश वाघ,मोहम्मद शमीन, सय्यद तल्हा, यश यादव यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला. 

प्रत्युत्तरात वन विभाग संघ १५ षटकात सर्वबाद ८४ धावाच करू शकला. यामध्ये कर्णधार आनंद गायके याने १५ चेंडूत २ षटकार व तीन चौकारांसह ३० धावा, यश यादव याने १७ चेंडूत ३ चौकारांसह १५ धावा तर सय्यद तल्हा याने ११ चेंडूत १ चौकारासह १९ धावांचे योगदान दिले. जिल्हा वकील ‘अ’ संघातर्फे गोलंदाजी करताना कर्णधार मोहित घाणेकर यांनी २० धावात २ गडी, हिंदुराव देशमुख याने १२ धावात २ गडी, निरंजन चव्हाण याने ११ धावात २ गडी, विकास नगरकर याने १२ धावात २ गडी तर ओम जाधव व दिनकर काळे यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला.

दुसरा सामना रुचा इंजिनिअरिंग व लॅब टेक्निशियन या संघांदरम्यान खेळविण्यात आला. लॅब टेक्निशियन संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकात ८ बाद १३९ धावा केल्या. यामध्ये उमेश पवार याने २८ चेंडूत १ षटकार व ६ चौकारांसह ४० धावा, शेख मुबीन याने २९ चेंडूत १ चौकारासह २३ धावा, विष्णू पाटील व ज्ञानेश्वर चव्हाण यांनी प्रत्येकी १० धावांचे  योगदान दिले. रुचा इंजिनिअरिंग संघातर्फे गोलंदाजी करताना सचिन नायर याने २२ धावांत ४ गडी तर ऋषिकेश कदम, निखिल सांगळे, मयंक विजयवर्गीय, लहू लोहार यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला. 

प्रत्युत्तरात रुचा इंजिनिअरिंग संघाने विजयी लक्ष १८ षटकात ६ गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केले. यामध्ये सोहम नरवडे याने २३ चेंडूत ३ चौकारांसह २९ धावा, लहू लोहार याने २४ चेंडूत १ चौकारासह २६ धावा, अमर यादव याने २२ चेंडूत १ षटकार व ३ चौकारांसह २८ धावा तर मयंक विजयवर्गीय याने १४ चेंडूत २ चौकारांसह १८ धावांचे योगदान दिले. लॅब टेक्निशियन संघातर्फे गोलंदाजी करताना मोहसीन खान, इरफान पठाण व कर्णधार नेताजी सापटे यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले.

तिसरा सामना होमिओपॅथिक डॉक्टर्स व जिल्हा वकील युनायटेड या संघांदरम्यान खेळविण्यात आला. होमिओपॅथिक डॉक्टर्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकात ७ बाद १५६ धावा केल्या. यामध्ये महेश दसपुते याने १९ चेंडूत २ उत्तुंग षटकार व २ चौकारांसह ३७ धावा, कर्णधार गिरीश गाडेकर याने १९ चेंडूत १ षटकार व ४ चौकारांसह ३० धावा, सुनील काळे याने १२ चेंडूत १ षटकार व ३ चौकारांसह २२ धावा, राजेंद्र चोपडा याने २१ चेंडूत २ चौकारांसह २१ धावा तर संदीप सानप व मयूर राजपूत यांनी प्रत्येकी १६ व १५ धावांचे  योगदान दिले. जिल्हा वकील युनायटेड संघातर्फे गोलंदाजी करताना जगदीश बनसोड याने ३८ धावात २ गडी, ओंकार कर्डिले याने ३५ धावात २ गडी तर सतीश बनसोड व सुनील घळ यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला.

प्रत्युत्तरात जिल्हा वकील युनायटेड संघ सर्वबाद ११७ धावाच करू शकला. यामध्ये सतीश बनसोड याने २४ चेंडूत ४ चौकारांसह २९ धावा, योगेश नेब याने २० चेंडूत ५ चौकारांसह २५ धावा, तर विक्रम भांगे याने १६ चेंडूत १३ धावांचे  योगदान दिले. होमिओपॅथिक डॉक्टर्स संघातर्फे गोलंदाजी करताना महेश दसपुते याने १६ धावांत ३ गडी, मयूर राजपूत याने २३ धावात २ गडी, विनोद यादव याने ८ धावात २ गडी तर राजेंद्र चोपडा व लक्ष्मण सूर्यवंशी यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला.

या सामन्यात पंचाची भूमिका अजय देशपांडे, विशाल चव्हाण, हसन जमा खान, आशिष देशपांडे, राजेश सिद्धेश्वर, महेश सावंत तर गुणलेखकाची भूमिका किरण भोळे यांनी पार पाडली, असे संयोजन समितीचे सदस्य व शहीद भगतसिंग क्रीडा व सांस्कृतिक मंडळाचे उपाध्यक्ष दामोदर मानकापे यांनी सांगितले.

सोमवारी होणारे उप उपांत्यपूर्व फेरीचे सामने

कंबाईंड बँकर्स व इंडियन मेडिकल असोसिएशन (सकाळी ७.३० वाजता)

महावितरण ‘अ’ व इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्चर (सकाळी ११ वाजता)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *