
छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यातील पहिल्या महिला क्रिकेट प्रीमियम लीग स्पर्धेचा रणसंग्राम १५ एप्रिलपासून एन २, सिडको येथील जिल्हा क्रिकेट संघटनेच्या मैदानावर पहावयास मिळणार आहे.
मराठवाड्यातील महिला क्रिकेट क्षेत्राला एक नवा आयाम देत ‘छत्रपती संभाजीनगर महिला प्रीमियर लीग’ या भव्य स्पर्धेचे आयोजन २० एप्रिल २०२५ पर्यंत करण्यात आले आहे. महिलांमध्ये खेळाची आवड निर्माण करणे, नवोदित खेळाडूंना व्यासपीठ उपलब्ध करून देणे, तसेच त्यांच्यातील कौशल्यांना योग्य दिशा देणे या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे उद्घाटन १५ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता होणार असून, यावेळी आंतरराष्ट्रीय क्रिकेट प्रशिक्षक आणि महिला मुंबई इंडियन्सच्या कोच देविका पळशीकर आणि मनपा आयुक्त जी श्रीकांत हे प्रमुख पाहुणे म्हणून आयोजक अजय भवलकर, अमित भोसेकर हे उपस्थित राहणार आहेत.
या स्पर्धेत मणी मंत्रा, आरएसआय क्यिन, पीएसबीए, मंगल दीप, ओरियन सिटी केयर, प्रेमा प्लॅटिनम आदी सहा संघ सहभागी होणार आहेत. प्रत्येक संघाचे नेतृत्व राज्यस्तरीय खेळाडूंकडे असणार असून महाराष्ट्र आणि भारताचे प्रतिनिधित्व केलेल्या आघाडीच्या सहा महिला क्रिकेटपटूंना देखील या स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे या स्पर्धेत दर्जेदार आणि चुरशीची सामने पाहायला मिळणार आहेत.
स्पर्धेचे स्वरूप आणि वेळापत्रक
सर्व सामने टी २० फॉरमॅटमध्ये खेळवले जाणार असून, उद्घाटनाच्या दिवशी एक सामना होईल व त्यानंतर दररोज दोन सामने होतील. त्यामुळे प्रेक्षकांना एकाच दिवशी दोन रोमांचक सामन्यांचा आनंद घेता येणार आहे. महिला क्रिकेटला प्रोत्साहन देण्यासाठी आणि या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी प्रेक्षकांनी सामन्यादरम्यान उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजक अजय भवलकर, अमित भोसेकर, दीपक पाटील, किशोर निकम, प्रियंका गारखेडे यांनी केले आहे.