
युनिव्हर्सल वन-डे लीग क्रिकेट ः ओंकार कर्डिले, विकास कल्याणकर, श्वेता सावंत, समर्थ पुरीची लक्षवेधक कामगिरी
छत्रपती संभाजीनगर ः युनिव्हर्सल क्रिकेट अकादमीतर्फे आयोजित करण्यात आलेल्य़ा युनिव्हर्सल करंडक अंडर १६ एकदिवसीय लीग क्रिकेट स्पर्धेत सोमवारी झालेल्या सामन्यात एमजीएम क्रिकेट अकादमी संघाने युनिव्हर्सल क्रिकेट अकादमी संघावर ८७ धावांनी मोठा विजय संपादन केला. या लढतीत ओंकार कर्डिले हा सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.

युनिव्हर्सल क्रिकेट अकादमीचे मुख्य संचालक व प्रशिक्षक राहुल पाटील यांनी आयोजित केलेली ही स्पर्धा युनिव्हर्सल क्रिकेट मैदानावर होत आहे. या सामन्यात एमजीएम क्रिकेट अकादमी संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि ३८.३ षटकात सर्वबाद १९० धावसंख्या उभारली. या धावसंख्येचा पाठलाग करताना युनिव्हर्सल क्रिकेट अकादमी संघ २४.१ षटकात १०३ धावांत सर्वबाद झाला. एमजीएम अकादमीने ८७ धावांनी सामना जिंकला.
या सामन्यात समर्थ पुरी याने ७५ चेंडूत ५५ धावांची शानदार अर्धशतकी खेळी केली. त्याने सात चौकार मारले. ओंकार कर्डिले याने ५७ चेंडूत ४० धावांची वेगवान खेळी केली. त्याने पाच चौकार ठोकले. विकास कल्याणकर याने ३४ चेंडूत ३१ जलद धावा काढल्या. त्याने दोन उत्तुंग षटकार व तीन चौकार मारले.

गोलंदाजीत विकास कल्याणकर याने २० धावांत चार विकेट घेऊन अष्टपैलू कामगिरी बजावली. ओंकार कर्डिले याने २२ धावांत चार विकेट घेऊन संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. श्वेता सावंत हिने ४४ धावांत चार गडी बाद करुन सामना गाजवला.
संक्षिप्त धावफलक ः एमजीएम क्रिकेट अकादमी ः ३८.३ षटकात सर्वबाद १९० (स्वरित दरक ११, समर्थ पुरी ५५, उदय इरतकर २६, विकास कल्याणकर ३१, ओंकार कर्डिले ४०, श्वेता सावंत ४-४४, मयंक कदम २-२३, प्रेम कासुरे २-१, विवेक सिंग १-४६, सोहम नरवडे १-३१) विजयी विरुद्ध युनिव्हर्सल क्रिकेट अकादमी ः २४.१ षटकात सर्वबाद १०३ (मयंक कदम १४, श्वेता सावंत १०, सोहम नरवडे ७, वैष्णव गायकर ८, प्रेम कासुरे २९, ओंकार कर्डिले ४-२२, विकास कल्याणकर ४-२०, विराज कानडे २-१६). सामनावीर ः ओंकार कर्डिले.