
१२ लाख रोख पारितोषिकासह संघातील प्रत्येक खेळाडूंनी पटकावली बाईक
मुंबई : टेनिस क्रिकेटमधिल वर्ल्डकप म्हणून ओळखला जाणारा सुप्रिमो कप डिंग डाँग रेड डेव्हिल्स संघाने जिंकला. अंतिम सामन्यात डिंग डाँग रेड डेव्हिल्स संघाने दुर्गापुर फ्रेंड्स युनियन क्लबचा धुव्वा उडवत यंदाच्या अकराव्या सुप्रिमो चषकावर आपले नावे कोरले आणि १२ लाख रुपयांच्या इनामासहीत संघातील प्रत्येक खेळाडूंनी प्रत्येकी एक बाईक जिंकली.
उपविजेत्या दुर्गापूर संघातर्फे एकाकी झुंज देणारा सुर्वोनिली रॉय स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू ठरला. त्याला अलिशान कार बक्षिस देण्यात आली. अंतिम सामन्यात प्रथम फलंदाजी करताना दुर्गापूर संघाला डिंग डाँगच्या भेदक गोलंदाजीसमोर फार काळ टिकता आले नाही. डिंग डाँगच्या संदीप यादव याने अवघ्या दोन षटकांत सात धावा देत पाच फलंदाजांना तंबूत पाठवले. या निर्णायक कामगिरीमुळे त्याला ‘सामनावीर’ म्हणून गौरवण्यात आले. संपूर्ण स्पर्धेत संदीपने चार सामन्यांत ८ षटकांत फक्त ४७ धावा देत ७ गडी बाद केले आणि सर्वोत्कृष्ट गोलंदाजाचा किताब पटकावला.
दुर्गापूर संघाने ४१ धावांचे लक्ष्य ठेवले, जे डिंग डाँग रेड डेविल्स संघाने फक्त ४.५ षटकांत गाठले. फलंदाज कृष्णा सातपुते याने २७ धावांची नाबाद खेळी साकारत सामना संघाच्या बाजूने झुकवला. डिंग डाँग संघाच्या सांघिक खेळामुळे त्यांचा विजय ठरलेला होता. दुर्गापूर फ्रेंड्स युनियन क्लबच्या अयुब शेख यानेही स्पर्धेत दमदार कामगिरी केली. त्याने चार सामन्यांत तीन डावात एकदा नाबाद राहत ४४ चेंडूत ८० धावा केल्या आणि त्यात सात षटकारांचा समावेश होता. त्याला स्पर्धेतील सर्वोत्तम फलंदाज म्हणून गौरवण्यात आले. सुप्रिमो स्पर्धेत अयुब याने चार हाफ सेंच्युरी झळकावल्या आहेत. मात्र सर्वांची मने जिंकली ती दुर्गापूरच्या सुर्वोनिल रॉय या गोलंदाजाने. त्याने स्पर्धेत सातत्यपूर्ण भेदक गोलंदाजी करीत स्पर्धेतील एकूण ८ षटकांत केवळ ५० धावा देऊन १३ गडी बाद केले. या अचूक गोलंदाजीमुळे त्याला स्पर्धेतील ‘मालिकावीर’ पुरस्कार देण्यात आला, आणि त्याच्यासोबतच एक आलिशान कार बक्षिस म्हणून मिळाली. मैदानावर उपस्थित प्रेक्षकांनी टाळ्यांच्या गजरात या खेळाडूचे अभिनंदन केले.
भव्य पारितोषिक वितरण समारंभात शिवसेना आमदार आदित्य ठाकरे यांच्या हस्ते विजेत्या संघाला सुप्रिमो चषक प्रदान करण्यात आला. “गेल्या ११ वर्षांपासून चालू असलेली ही स्पर्धा आज इतक्याभव्य स्वरूपात पार पडते, हे खरोखरच प्रेरणादायी आहे. या स्पर्धेमुळे उपनगरातील खेळाडूंना मोठ्या व्यासपीठावर चमकण्याची संधी मिळते,” असे गौरवोद्गार त्यांनी यावेळी काढले. कार्यक्रमास माजी हॉकी कर्णधार धनराज पिल्ले, खासदार अरविंद सावंत, आमदार आणि स्पर्धा आयोजक आमदार संजय पोतनीस, माजी महापौर श्रद्धा जाधव, युवा क्रिकेटपटू पृथ्वी शॉ, प्रशिक्षक प्रदीप सुंदरम, शिवसेना नेते मिलिंद नार्वेकर, एमसीए अध्यक्ष अजिंक्य नाईक, आमदार हरून खान, खासदार विनायक राऊत, तसेच उदयोन्मुख क्रिकेटपटू तनिष कोटियन यांची उपस्थिती लाभली. स्पर्धेचे संयोजन, नियोजन आणि आयोजन हे अतिशय शिस्तबद्ध व व्यावसायिक पद्धतीने करण्यात आले. विविध वयोगटातील प्रेक्षकांनी हजेरी लावत स्पर्धेला अफाट प्रतिसाद दिला. सुप्रिमो चषक केवळ एक क्रिकेट स्पर्धा नसून नवोदित खेळाडूंना मोठ्या व्यासपीठावर आणणारी आणि समाजाला एकत्र बांधणारी चळवळ ठरत आहे, हे पुन्हा सिद्ध झाले.