
लखनौ ः चेन्नई सुपर किंग्ज संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने आयपीएल स्पर्धेत एक नवा इतिहास रचला आहे. धोनी याने ४३ वर्षे २८१ दिवस असताना सामनावीर पुरस्कार संपादन केला आहे. अशी कामगिरी करणारा धोनी हा सर्वात वयस्कर खेळाडू ठरला आहे.
धोनीच्या स्फोटक फलंदाजीच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्जने लखनऊ सुपर जायंट्सचा ५ विकेट्सने पराभव केला. धोनीला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार एमएस धोनीने लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध ११ चेंडूत २६ धावांची नाबाद खेळी केली आणि ३ चेंडू शिल्लक असताना आपल्या संघाला ५ विकेटने विजय मिळवून दिला. या हंगामात संघाचा हा दुसरा विजय आहे. हा सामना लखनौच्या एकाना क्रिकेट स्टेडियमवर खेळला गेला. लखनौने प्रथम फलंदाजी करत चेन्नईला १६७ धावांचे लक्ष्य दिले. धोनीची सामनावीर म्हणून निवड झाली. त्याने ६ वर्षांनी आयपीएलमध्ये हा पुरस्कार जिंकला आहे.
आयपीएलच्या इतिहासात सामनावीराचा पुरस्कार मिळवणारा एमएस धोनी हा सर्वात वयस्कर खेळाडू ठरला आहे. त्याने ४३ वर्षे आणि ६० दिवसांच्या वयात हा पुरस्कार जिंकणाऱ्या प्रवीण तांबेचा विक्रम मोडला. ४३ वर्षे २८१ दिवसांच्या वयात एमएस धोनीने सामनावीराचा पुरस्कार जिंकला.
आयपीएलमध्ये एमएस धोनीचा हा १८ वा सामनावीर पुरस्कार आहे. २००८ मध्ये जेव्हा त्याने पहिल्यांदा हा पुरस्कार जिंकला तेव्हा तो २५ वर्षांचा होता. याआधी, त्यांना शेवटचा हा पुरस्कार २०१९ मध्ये देण्यात आला होता, तेव्हा धोनी ३७ वर्षांचा होता.
धोनीची आयपीएल आकडेवारी
एमएस धोनीच्या आयपीएल कारकिर्दी लक्षवेधक आहे. धोनीने २७१ सामन्यांमध्ये ५३७३ धावा केल्या आहेत, त्याची सर्वोच्च धावसंख्या ८४ धावा आहे. त्याने आयपीएलमध्ये आतापर्यंत २४ अर्धशतके झळकावली आहेत. त्याने स्पर्धेत ३७३ चौकार आणि २६० षटकार मारले आहेत.
क्षेत्ररक्षक म्हणून धोनीने एक विक्रम रचला
या सामन्यात धोनीने क्षेत्ररक्षक म्हणून आणखी एक विक्रम केला. त्याने सर्वाधिक फलंदाजांना बाद करण्याचा विक्रमही केला. धोनीने आयपीएलमध्ये २०१ वेळा फलंदाजांना पॅव्हेलियनमध्ये पाठवले आहे. यामध्ये कॅच आउट, स्टंप आणि रनआउटचा समावेश आहे. मनोरंजक गोष्ट म्हणजे, सक्रिय खेळाडूंमध्ये, फक्त विराट कोहली त्याच्या मागे आहे ज्याने क्षेत्ररक्षक म्हणून विरोधी संघाच्या फलंदाजांना ११६ वेळा बाद केले आहे.