
चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील शानदार कामगिरीची आयसीसीने घेतली दखल
दुबई ः भारतीय संघाचा मधल्या फळीतील स्टार फलंदाज श्रेयस अय्यर याला आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) प्लेअर ऑफ द मंथ पुरस्कार जाहीर केला आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने भारतीय संघाचा स्टार फलंदाज श्रेयस अय्यरला मार्च महिन्यासाठी आयसीसी पुरुष खेळाडू ऑफ द मंथ पुरस्काराने सन्मानित केले. आयसीसीने मंगळवारी याची घोषणा केली आणि चॅम्पियन्स ट्रॉफीमधील श्रेयस अय्यरच्या कामगिरीचे कौतुक केले.
भारताकडून सर्वाधिक धावा करणारा खेळाडू
भारताच्या विजेतेपद विजयात श्रेयसने महत्त्वाची भूमिका बजावली. तो चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताकडून सर्वाधिक २४३ धावा करणारा फलंदाज होता. या स्पर्धेत त्याने दोन अर्धशतकी खेळी खेळल्या. आयसीसीने महिन्यातील सर्वोत्तम खेळाडू म्हणून निवड झाल्यानंतर अय्यर म्हणाला की, “मार्च महिन्यातील आयसीसी पुरुष खेळाडू म्हणून निवड झाल्याने मी खरोखरच सन्मानित आहे. ही ओळख अविश्वसनीयपणे खास आहे, विशेषतः ज्या महिन्यात आपण आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली – हा क्षण मी नेहमीच जपून ठेवेन.
अंतिम सामन्यात श्रेयसची बॅट गरजली
भारताने न्यूझीलंडला हरवून चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ चे विजेतेपद पटकावले. हे भारताचे सलग दुसरे आयसीसी स्पर्धा विजेतेपद आहे. यापूर्वी २०२४ मध्ये टीम इंडियाने टी २० विश्वचषक जिंकला होता. दुबईमध्ये खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात, ३० वर्षीय फलंदाज श्रेयस अय्यरने दोन चौकार आणि तितक्याच षटकारांच्या मदतीने ४८ धावा केल्या. भारताने हा सामना चार विकेट्सने जिंकला.
अय्यरने चाहत्यांचे आभार मानले
यावेळी अय्यरने चाहत्यांचे आभार मानले. तो म्हणाला, एवढ्या मोठ्या मंचावर भारताच्या यशात योगदान देणे हे प्रत्येक क्रिकेटपटूचे स्वप्न असते. माझ्या संघातील सहकारी, प्रशिक्षक आणि सपोर्ट स्टाफ यांनी दिलेल्या अढळ पाठिंब्याबद्दल आणि विश्वासाबद्दल मी त्यांचे आभारी आहे. चाहत्यांचेही मनापासून आभार. तुमची ऊर्जा आणि प्रोत्साहन आम्हाला प्रत्येक पावलावर पुढे जाण्यास मदत करते.