
सांगली, सेक्रेटरी इलेव्हनवर दणदणीत विजय
पुणे ः महाराष्ट्र क्रिकेट संघटनेतर्फे आयोजित महिला एकदिवसीय सुपर लीग क्रिकेट स्पर्धेत सोलापूर महिला संघाने सांगली आणि सेक्रेटरी इलेव्हन या संघांचा सहज पराभव करुन आगेकूच कायम ठेवली आहे.
पुणे येथे महिला एकदिवसीय क्रिकेट लीग स्पर्धा होत आहे. पहिल्या सामन्यात सोलापूर संघाने सांगली संघाचा पराभव केला. या लढतीत सोलापूर संघाने ४५ षटकात ९ बाद १७९ धावा केल्या. त्यामध्ये विभावरी देवकते हिने सर्वाधिक ६३ धावा केल्या. प्रत्युत्तरात सांगली संघाने ३८ षटकात सर्वबाद १४० धावा केल्या. त्यामध्ये श्रेया जगदाळे हिने ३४ धावांचे योगदान दिले. सोलापूर संघाकडून साक्षी लामकाने १३ धावांत तीन बळी टिपले. कार्तिकी देशमुख हिने १२ धावांत २ बळी, भक्ती पवार हिने २३ धावात २ बळी, पुनम माशाळे हिने ३८ धावांत २ बळी घेतले. हा सामना सोलापूर जिल्हा संघाने ३५ धावांनी जिंकला.

दुसऱया सामन्यात सोलापूर संघाने सेक्रेटरी संघावर सहा विकेट राखून विजय मिळवला. या सामन्यात सेक्रेटरी इलेव्हन संघाने ४५ षटकात ९ बाद १३६ धावा केल्या. त्यामध्ये राजलक्ष्मी कोरे हिने ४१ धावा केल्या. सोलापूर संघाकडून विभावरी देवकते हिने २१ धावांत तीन तर सेन्हा बेजगाम हिने २३ धावांत तीन बळी टिपले.
प्रत्युत्तरात सोलापूर जिल्हा संघाने २९ षटकात ४ बाद १४० धावा केल्या. त्यामध्ये आर्या उमाप हिने ४५ धावा, गौरी पाटील हिने २९ धावा, स्नेहा शिंदे हिने २१ धावा काढल्या. हा सामना सोलापूर जिल्हा संघाने सहा गडी राखून जिंकला.
सोलापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे चेअरमन रणजितसिंह मोहिते पाटील तसेच सेक्रेटरी धैर्यशील मोहिते पाटील आणि चंद्रकांत रेंबुर्सु तसेच सर्व कार्यकारी पदाधिकारी यांनी संघाचे अभिनंदन केले आहे.