आरएसआय क्वीन्स संघाचा ७५ धावांनी विजय 

  • By admin
  • April 15, 2025
  • 0
  • 29 Views
Spread the love

महिला प्रीमियर लीग क्रिकेट ः अष्टपैलू ईश्वरी सावकर सामनावीर 

छत्रपती संभाजीनगर ः छत्रपती संभाजीनगर महिला प्रीमियर लीग टी २० क्रिकेट स्पर्धेत आरएसआय क्वीन्स संघाने मनी मंत्र स्ट्रायकर्स संघाचा ७५ धावांनी पराभव करुन दणदणीत विजयी सलामी दिली. या सामन्यात ईश्वरी सावकर हिने सामनावीर पुरस्कार संपादन केला. 

जिल्हा क्रिकेट संघटनेच्या एडीसीए क्रिकेट मैदानावर मंगळवारी महिला प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेला शानदार प्रारंभ झाला. मुंबई इंडियन्स महिला संघाच्या प्रशिक्षक देविका पळशीकर यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी आयोजक अजय भवलकर, अमित भोसेकर, दीपक पाटील, किशोर निकम, प्रियंका गारखेडे आदी उपस्थित होते. 

मनी मंत्र स्ट्रायकर्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलदांजी करण्याचा निर्णय घेतला. आरएसआय क्वीन्स संघाने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात सात बाद १२१ धावसंख्या उभारली. प्रत्युत्तरात मनी मंत्र स्ट्रायकर्स संघ १४.३ षटकात अवघ्या ४६ धावांत गडगडला. त्यामुळे आरएसआय क्वीन्स संघाने तब्बल ७५ धावांनी सामना जिंकून स्पर्धेची सुरुवात दिमाखदारपणे केली. 

या सामन्यात ईश्वरी सावकर हिने ४१ चेंडूत ४५ धावांची आक्रमक खेळी केली. तिने सात चौकार मारले. जिया सिंग हिने १७ चेंडूत १६ धावा काढल्या. तिने दोन चौकार मारले. श्रुती गिते हिने दोन चौकरांसह १४ धावांचे योगदान दिले. गोलंदाजीत पायल पवार हिने दोन षटके गोलंदाजी करताना दोन्ही षटके निर्धाव टाकत दोन विकेट घेतल्या हे विशेष. भक्ती मिरजकर हिने ८ धावांत दोन गडी बाद केले. ईश्वरी सावकर हिने ११ धावांत दोन बळी घेत अष्टपैलू कामगिरी बजावली.

संक्षिप्त धावफलक ः आरएसआय क्वीन्स ः २० षटकात सात बाद १२१ (जिया सिंग १६, ईश्वरी सावकर ४५, श्रुती गिते १४, पायल पवार १३, मीना गुरवे ६, निकिता मोरे नाबाद ६, संजना वाघमोडे नाबाद ६, इतर १४, भक्ती मिरजकर २-८, मधुरा दायमा २-१८, यशोदा घोगरे १-१४, अदिती लांडे १-२४, पूजा वाघ १-८) विजयी विरुद्ध मनी मंत्र स्ट्रायकर्स ः १४.३ षटकात सर्वबाद ४६ (शितल देशमुख ११, वाय आर सिंग राजपूत ८, यशोदा घोगरे ९, मीना गुरवे २-१५, ईश्वरी सावकर २-११, पायल पवार २-०, संजना वाघमोडे १-६, लक्ष्मी यादव १-२). सामनावीर ः ईश्वरी सावकर. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *