पंजाब किंग्जचा केकेआर संघावर रोमहर्षक विजय 

  • By admin
  • April 15, 2025
  • 0
  • 9 Views
Spread the love

युजवेंद्र चहल, जॅनसेनची घातक गोलंदाजी निर्णायक, पंजाब १५ धावांनी विजयी 

चंदीगड : युझवेंद्र चहल (४-२८), मार्को जॅनसेन (३-१७) यांच्या प्रभावी व अचूक गोलंदाजीच्या बळावर पंजाब किंग्ज संघाने गतविजेत्या केकेआर संघाला अवघ्या ९५ धावांवर रोखून १५ धावांनी रोमहर्षक विजय नोंदवला. या अविस्मरणीय विजयाने पंजाबने पाचवा विजय साकारत दहा गुणांची कमाई केली आहे. 

केकेआर संघासमोर विजयासाठी केवळ ११२ धावांचे आव्हान होते. पंजाबने क्विंटन डी कॉक (२) व सुनील नरेन (५) ही सलामी जोडीने झटपट गुंडाळून सामन्यात थोडी रंगत आणली. दुसऱ्याच षटकात केकेआर संघ दोन बाद ७ अशा स्थितीत होता. कर्णधार अजिंक्य रहाणे व अंगकृष्ण रघुवंशी यांनी आक्रमक फलंदाजी करत डाव सावरला. या जोडीने तिसऱ्या विकेटसाठी ५५ धावांची भागीदारी केली. चहल याने रहाणेला पायचीत बाद करुन तिसरा धक्का दिला. रहाणे याने एक चौकार व एक षटकार मारला. रहाणे बाद झाल्यानंतर केकेआर संघाला चौथा धक्का १०व्या षटकात बसला. अंगकृष्ण रघुवंशी याची आक्रमक खेळी ३७ धावांवर संपुष्टात आली. त्याने पाच चौकार व एक षटकार मारला. 

चहलच्या जादुई स्पेलमुळे सामन्यात रंगत आली. चहलने रघुवंशी (३७), रिंकू सिंग ९२), रमणदीप सिंग (०) यांना बाद करुन सनसनाटी निर्माण केली. मॅक्सवेलने व्यंकटेश अय्यर (७), जॅनसेन याने हर्षित राणा (३) यांना बाद करुन केकेआर संघावर मोठा दबाव आणला. दोन बाद ६२ अशा भक्कम स्थितीत असलेला केकेआर संघाने ७९ धावसंख्येपर्यंत सहा फलंदाज गमावले होते. ८ बाद ७९ अशी केकेआर संघाची खराब स्थिती झाली. अर्शदीपने वैभव अरोराला (०) बाद करुन केकेआर संघाला नववा धक्का दिला. आंद्रे रसेलवर संघाची मोठी भिस्त होती. परंतु, जॅनसेन याने रसेल याला १७ धावांवर क्लीन बोल्ड करत संघाला रोमहर्षक विजय मिळवून दिला. पंजाबने केकेआर संघाला १५.१ षटकात ९५ धावसंख्येवर रोखून १५ धावांनी रोमांचक सामना जिंकला. युजवेंद्र चहल याने २८ धावांत चार विकेट घेऊन सामन्याला कलाटणी दिली. मार्को जॅनसेन याने १७ धावांत तीन गडी बाद करुन विजयात मोलाचा वाटा उचलला. 

पंजाब संघाचा डाव गडगडला

हर्षित राणाच्या नेतृत्वाखालील गोलंदाजांच्या शानदार कामगिरीच्या मदतीने केकेआरने पंजाबला १५.३ षटकांत १११ धावांवर गुंडाळले. पंजाबने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, परंतु केकेआरच्या गोलंदाजांनी शानदार गोलंदाजी केली ज्यामुळे पंजाब संघ पूर्ण २० षटकेही खेळू शकला नाही. पंजाबकडून सलामीवीर प्रभसिमरन सिंगने सर्वाधिक धावा केल्या. प्रभसिमरन सिंगने १५ चेंडूत दोन चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने ३० धावा केल्या.

प्रथम फलंदाजी करताना प्रभसिमरन आणि प्रियांश आर्य यांनी संघाला चांगली सुरुवात करून दिली आणि संघाने अवघ्या तीन षटकांत ३० धावांचा टप्पा ओलांडला. तथापि, चौथे षटक टाकण्यासाठी आलेल्या हर्षितने प्रियांशला बाद करून पंजाबला पहिले यश मिळवून दिले. प्रियांश १२ चेंडूत तीन चौकार आणि एका षटकारासह २२ धावा काढून बाद झाला होता. येथून पंजाबचा डाव डळमळीत झाला आणि त्यांनी नियमित अंतराने विकेट गमावल्या. चांगल्या फॉर्ममध्ये असलेला कर्णधार श्रेयस अय्यरला त्याचे खातेही उघडता आले नाही.

पंजाबची फलंदाजी इतकी खराब होती की संघाचे फक्त पाच फलंदाजच दुहेरी आकडा गाठू शकले. पंजाबकडून शशांक सिंगने १८ धावा केल्या, ज्यामुळे संघाला १०० च्या पुढे धावसंख्या उभारता आली. याशिवाय झेवियर बार्टलेटने ११, नेहल वधेरा यांनी १०, ग्लेन मॅक्सवेलने सात, सूर्यांश शेडगे यांनी चार आणि मार्को जानसेन यांनी एक धाव केली. दरम्यान, अर्शदीप सिंग एक धाव काढून नाबाद परतला. केकेआरकडून हर्षित सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला ज्याने तीन षटकांत २५ धावा देत तीन बळी घेतले. त्याच्याशिवाय वरुण चक्रवर्ती आणि सुनील नारायण यांनी प्रत्येकी दोन, तर वैभव अरोरा आणि अँरिच नोर्टजे यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *