
दहावी मित्सुई शोजी टी २० क्रिकेट लीग ः विराज जाधव, भूषण तळवडेकर चमकले
मुंबई : विराज जाधवच्या (५३) दमदार अर्धशतकी खेळीमुळे ठाणे मराठाज् संघाने आज ज्वाला स्पोर्ट्स फौंडेशन आणि एमसीसी आयोजित १० व्या मित्सुई शोजी टी २० क्रिकेट लीग स्पर्धेत गतविजेत्या मुंबई पोलिस सिटी रायडर्स संघाला पराभवाचा धक्का दिला.
सकाळच्या सत्रात नाणेफेक जिंकून खेळपट्टीतील दमटपणाचा फायदा उचलण्यासाठी त्यांनी मुंबई पोलिसांना प्रथम फलंदाजीस आमंत्रित केले आणि निर्धारित २० षटकांत त्यांना ९ बाद ९७ धावांत रोखले. मुंबईचा रणजीवीर आतिफ अत्तारवाला (१७/२) आणि अक्षय गायकवाड (२२/२) यांनी टिच्चून गोलंदाजी केली. या तुटपुंज्या आव्हानाचा पाठलाग करताना विराज जाधवच्या दमदार अर्धशतकी खेळीमुळे ठाणे मराठाज् संघाने ९ षटकांतच ३ बाद ९९ धाव करीत विजयला गवसणी घातली. विराजने २८ चेंडूंतच ९ चौकार आणि दोन षटकारांसह ५४ धावा करून संघाचा विजय निश्चित केला. सिद्धांत अधटराव (१७) आणि यश साळुंखे (नाबाद १६) यांनीही धावसंख्येत खारीचा वाटा उचलला. विराज जाधव यालाच सामन्यातील सर्वोत्तम खेळाडू म्हणून गौरविण्यात आले.

तत्पूर्वी, ठाणे मराठाज् संघाने भूषण तळवडेकर याच्या नाबाद ७० धावांच्या खेळीमुळे घाटकोपर जेट्स विरुद्ध चार विकेट्स आणि दोन षटके राखून आरामात विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या घाटकोपर जेट्स संघाने २० षटकांत ७ बाद १५० धावा केल्या. त्यात सिद्धार्थ आकरे (३३), सिद्दीद तिवारी (२८), सौरभ सिंग (२०) आणि आदित्य श्रीवास्तव (१७) यांनी प्रमुख धावा केल्या. वेगवान गोलंदाज अंकित यादव (२/२१) आणि ऑफ स्पिनर मॅक्सवेल स्वामीनारायण (२/१९) यांनी प्रत्येकी दोन बळी मिळविले.
या आव्हानासमोर ठाणे मराठाज संघाने ९६ धावांत ३ बळी गमावले होते. मात्र नंतर भूषण तळवडेकर (नाबाद ७०) याने अमन मणियार (नाबाद १२) यांच्यासह चौथ्या विकेटसाठी ५८ धावांची अभेद्य भागी रचून संघाला विजय मिळवून दिला. भूषण तळवडेकर याची सामन्यातील सर्वोत्तम खेळाडू या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.
संक्षिप्त धावफलक ः १) मुंबई पोलिस सिटी रायडर्स ः २० षटकांत ९ बाद ९७ (रोनित घोसाळे १७, धर्मराज बगारे १८, मयांक तिवारी १५; आतिफ अत्तारवाला १७ धावांत २ बळी, अजिंक्य बेलोसे २२ धावांत २ बळी) पराभूत विरुद्ध ठाणे मराठाज् ः ९ षटकांत ३ बाद ९९ (विराज जाधव ५४, सिद्धांत अधटराव १७, यश साळुंखे नाबाद १६). सामनावीर ः विराज जाधव .
२) घाटकोपर जेट्स ः २० षटकांत ७ बाद १५० (रोहन गाजर २१, आदित्य श्रीवास्तव १७, सिद्धार्थ आकरे ३३, सिद्दीद तिवारी २८, सौरभ सिंग २०, अंकित यादव २/२१, मॅक्सवेल स्वामीनारायण २/१९) पराभूत विरुद्ध ठाणे मराठाज् ः १८ षटकांत ६ बाद १५४ (अजित पेहलवान २०, रिदय खांडके २८, भूषण तळवडेकर नाबाद ७०, अमान मणियार नाबाद १२; दानित राऊत ३/२५, हिमांशू सिंग २/२४) सामनावीर ः भूषण तळवडेकर.