
जळगाव ः महाराष्ट्र शासनाच्या वतीने दरवर्षी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा सन्मान शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार, जीवनगौरव पुरस्कार, जिजामाता महिला क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार तसेच साहसी पुरस्कार प्रदान करून करण्यात येतो.

सन २०२२-२३ व २०२३-२४ या दोन वर्षांतील पात्र पुरस्कारार्थ्यांचा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार वितरण समारंभ शुक्रवारी (१८ एप्रिल) सकाळी ११.०० वाजता शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे-बालेवाडी, पुणे येथील बॅडमिंटन हॉलमध्ये आयोजित करण्यात आला आहे. या समारंभास राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, क्रीडा व युवक कल्याण मंत्री, अल्पसंख्यांक विकास व औकाफ मंत्री तसेच अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

या पुरस्कारांतर्गत जळगाव जिल्ह्यातील पाच खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. त्यात वर्ष २०२२-२३ यासाठी अभिजीत दत्तात्रय त्रिपणकर (कॅरम), नेहा नितीन देशमुख (सॉफ्ट बॉल), जयेश यशवंतराव मोरे (सॉफ्ट बॉल), वर्ष २०२३-२४ साठी रेखा पूना धनगर (बेस बॉल), प्रीतीश रमेश पाटील (सॉफ्ट बॉल) या खेळाडूंचा समावेश आहे. या सर्व खेळाडूंनी राज्य व राष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी करत जळगाव जिल्ह्याचा आणि राज्याचा मान वाढविला आहे.

या यशाबद्दल केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे, जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे व जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सर्व खेळाडूंचे अभिनंदन केले असून, या गौरवाने जिल्ह्यातील क्रीडा संस्कृतीला अधिक बळ मिळेल, असे मत व्यक्त केले आहे, अशी माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक यांनी दिली.
