
मित्सुई शोजी टी २० क्रिकेट लीग
मुंबई : सुवेद पारकरच्या (१३७) झंझावाती शतकामुळे शिवाजी पार्क वॉरियर्स संघाने बांद्रा हिरोज् विरुद्ध ७७ धावांनी मोठ्या विजयाची नोंद केली.

ज्वाला स्पोर्ट्स फाऊंडेशन आणि एमसीसी आयोजित १० व्या मित्सुई शोजी टी २० क्रिकेट लीग स्पर्धेच्या या साखळी लढतीत शिवाजी पार्क वॉरियर्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आणि त्यांच्या फलंदाजांनी २० षटकांत ६ बाद २८० असा धावांचा डोंगर उभा केला. हार्दिक तामोरे आणि सुवेद पारकर या जोडीने १५.३ षटकांतच १५३ धावांची सलामी दिली. तामोरे याने ३७ चेंडूत ७ चौकार आणि ५ षटकारांच्या साहाय्याने ६८ तर सुवेद पारकरने केवळ ५९ चेंडूत १७ चौकार आणि आणि ८ उत्तुंग षटकार मारताना १३७ धावा केल्या. सुवेदने अग्नी चोप्रा (२६) याच्या साथीने दुसऱ्या विकेटसाठी ५१ तर तनुश कोटियन (३१) यांच्यासह तिसऱ्या विकेटसाठी ७६ धावांची भागीदारी केली. श्रेयांश बोगर याने डावातील शेवटच्या षटकात शतकवीर सुवेद पारकर यांच्यासह तीन बळी मिळविले अन्यथा त्यांना तीनशे धावांची वेस ओलांडता आली असती. मात्र यंदाच्या स्पर्धेतील ही सर्वोच्च धावसंख्या ठरली.
या आव्हानाचा पाठलाग करताना बांद्रा हिरोज संघाने २० षटकांत ८ बाद २०३ धावा केल्या. प्रयाग भाटी (३३) आणि अवैस खान (१३) यांनी ४५ धावांची सलामी दिली तर मुकेश गुप्ता याने ३२ चेंडूत ५ चौकार आणि ४ षट्कारांसह नाबाद ६० धावा केल्या. शिवाजी पार्क वॉरियर्स साठी मध्यमगती गोलंदाज सचिन गुप्ता याने ३९ धावांत ३ तर डावखुरा फिरकी गोलंदाज शिवम यादव याने २२/२ आणि ऑफ स्पिनर देव पटेल याने १७/२ बळी मिळविले. शतकवीर सुवेद पारकर याचीच सामन्यातील सर्वोत्तम खेळाडू म्हणून निवड करण्यात आली.

दरम्यान, गुरुवारच्या सकाळच्या सत्रात बांद्रा हिरोज संघाने आपल्या शेवटच्या लढतीत या स्पर्धेतील आपल्या पहिल्या विजयाची नोंद करताना ठाणे मराठाज् विरुद्ध ४ विकेट्सनी विजय मिळविला. ठाणे मराठाज् संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित करून त्यांना ९ बाद १७१ धावांवर रोखण्याची करामत त्यांनी केली. सिद्धांत अधटराव (३२), विराज जाधव (२७) आणि अजिंक्य बेलोसे (नाबाद २९) यांनी प्रमुख धावा केल्या, यासिन शेख (२६/२) आणि निशांत त्रिवेदी (१४/२) या फिरकी गोलंदाजांनी प्रत्येकी दोन बळी मिळवले.
या आव्हानाचा पाठलाग करताना अमित चौहान (५४) आणि मनदीप सिंग (४३) यांनी ११.२ षटकांतच ९८ धावांची सलामी दिली तर नंतर अवैस खान (२१) आणि अयाज खान नाबाद २१ यांनी संघाला विजयी केले. ऑफ स्पिनर अजिंक्य बेलोसे याने ३४ धावांत ३ तर डावखुरा फिरली गोलंदाज आर्यन दलाल याने २८ धावांत २ बळी मिळविले. अमित चौहान याची सामनावीर म्हणून निवड करण्यात आली.
संक्षिप्त धावफलक ः १) शिवाजी पार्क वॉरियर्स ः २० षटकांत ६ बाद २८० (हार्दिक तामोरे ६८, सुवेद पारकर १३७, अग्नी चोप्रा २६, तानुश कोटियन ३१, श्रेयांश बोगर ४०/३) विजयी विरुद्ध बांद्रा हिरोज ः २० षटकांत ८ बाद ३०२ (प्रयाग भाटी ३३, अवैस खान १३, मुकेश गुप्ता नाबाद ६०, सचिन गुप्ता ३९ धावांत ३ बळी, शिवम यादव २२ धावांत २ बळी, देव पटेल १७ धावांत २ बळी) सामनावीर ः सुवेद पारकर.
२) ठाणे मराठाज् ः २० षटकांत ९ बाद १७१ (अनिष्ट चौधरी १६, यश साळुंखे १६, सिद्धांत अधटराव ३२, प्रणय कपाडिया १७, विराज जाधव २७, अजिंक्य बेलोसे नाबाद २९, यासिन शेख २६ धावांत २ बळी, निशांत त्रिवेदी १४ धावांत २ बळी) पराभूत विरुद्ध बांद्रा हिरोज् ः २० षटकांत ६ बाद १७४ (अमित चौहान ५४, मनदीप सिंग ४३, अयाज खान ३१ नाबाद, अवैस खान २१, आर्यन दलाल २८ धावांत २ बळी, अजिंक्य बेलोसे ३२ धावांत ३ बळी). सामनावीर ः अमित चौहान.