
नांदेड ः नांदेडची आंतरराष्ट्रीय पॅरा बॅडमिंटनपटू लताताई उमरेकरला शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. दिव्यांग पॅरा बॅडमिंटन थेट पुरस्कार लताताई उमरेकरला जाहीर झाला आहे.
शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार वितरण समारंभ राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या हस्ते व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवारी (१८ एप्रिल) सकाळी ११ वाजता शिवछत्रपती क्रीडा संकुल (बॅडमिंटन हॉल) म्हाळुंगे-बालेवाडी, पुणे येथे संपन्न होणार आहे.
लताताई उमरेकर यांनी पॅरा वर्ल्ड चॅम्पियनशिप (२०२२), पॅरा बॅडमिंटन वर्ल्ड अॅबिलिटी क्रीडा स्पर्धा (२०२३), पॅरा बॅडमिंटन वर्ल्ड चॅम्पियनशिप (२०२४), आंतरराष्ट्रीय दिव्यांग बॅडमिंटन स्पर्धा (२०२२), वर्ल्ड अॅबिलिटी गेम्स (२०२३), आंतरराष्ट्रीय दिव्यांग बॅडमिंटन स्पर्धा (२०२४), राष्ट्रीय पॅरा बॅडमिंटन स्पर्धा (२०२१), खेलो इंडिया पॅरा बॅडमिंटन स्पर्धा (२०२४, २०२५) अशा विविध स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी बजावत घवघवीत यश संपादन केले आहे. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल लताताई उमरेकर यांना थेट पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
लताताई उमरेकर या सध्या पुणे येथे क्रीडा विभागात मुख्य क्रीडा कार्यकारी अधिकारी या पदावर कार्यरत आहेत. त्यांना किरण माने, चेतन माने यांचे मार्गदर्शन मिळाले आहे. शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल नांदेडचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे यांनी लताताई उमरेकर यांचे अभिनंदन केले आहे.