
हैदराबाद संघावर चार विकेट राखून विजय, रोहित, जॅक्स, रिकेलटन, सूर्या, हार्दिकची आक्रमक फलंदाजी
मुंबई : आयपीएल स्पर्धेतील तिसरा विजय नोंदवताना मुंबई इंडियन्स संघाने सनरायझर्स हैदराबाद संघाचा चार विकेट राखून पराभव केला. हैदराबाद संघाचा हा पाचवा पराभव आहे.
घरच्या मैदानावर खेळताना मुंबई इंडियन्स संघासमोर विजयासाठी १६३ धावांचे लक्ष्य होते. रोहित शर्मा व रायन रिकेलटन या सलामी जोडीने डावाची सुरुवात आक्रमक केली. रोहितने १६ चेंडूत २६ धावांची जलद खेळी केली. रोहितने तीन उत्तुंग षटकार मारले. रोहितला सूर गवसला असे वाटत असताना कमिन्सच्या फुलटॉस चेंडूवर तो सोपा झेल देऊन बाद झाला. हेड याने त्याचा झेल टिपला. त्यानंतर रायन रिकेलटन ३१ धावांवर बाद झाला. त्याने २३ चेंडूत पाच चौकार ठोकले. मुंबईला ८व्या षटकात दुसरा धक्का बसला तेव्हा धावसंख्या दोन बाद ६९ अशी होती.
सूर्यकुमार यादव आणि विल जॅक्स या जोडीने तिसऱ्या विकेटसाठी शानदार ५२ धावांची भागीदारी करत डावाला आकार दिला. १३व्या षटकात सूर्यकुमार याला कमिन्स याने बाद केले. सूर्यकुमार याने १५ चेंडूत २६ धावा फटकावल्या. सूर्याने दोन टोलेजंग षटकार व दोन चौकार मारले. षटकार मारण्याच्या प्रयत्नात सूर्याने आपली विकेट गमावली. विल जॅक्स ३६ धावांवर बाद झाला. कमिन्सने जॅक्सला बाद करुन सामन्यातील तिसरा बळी मिळवला. त्याने तीन चौकार व दोन षटकार ठोकले.
तिलक वर्मा व कर्णधार हार्दिक पंड्या या जोडीने धावफलक हलता ठेवला. मात्र, हार्दिक ९ चेंडूत २१ धावांची स्फोटक खेळी करुन बाद झाला. त्याने तीन चौकार व एक षटकार मारला. नमन धीर (०) त्याच षटकात बाद झाला. ईशान मलिंगा याने हार्दिक व नमन या दोघांना बाद करुन सामन्यात थोडी रंगत आणली. तिलक वर्माने झीशान अन्सारीला सुरेख चौकार ठोकत विजयावर शिक्कामोर्तब केले. तिलक वर्माने १७ चेंडूत नाबाद २१ धावा काढल्या. त्याने दोन चौकार मारले. सँटनर (०) नाबाद राहिला. १८.१ षटकात मुंबईने सहा बाद १६६ धावा फटकावत चार विकेटने सामना जिंकला. कमिन्स याने २६ धावांत तीन विकेट घेतल्या.

सनरायझर्स हैदराबाद ५ बाद १६२
शेवटच्या षटकात अनिकेत वर्माच्या शानदार फलंदाजीमुळे सनरायझर्स हैदराबादने मुंबई इंडियन्ससमोर १६३ धावांचे लक्ष्य ठेवले. या सामन्यात मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. हैदराबादची फलंदाजी मंद होती, पण अनिकेतने २० व्या षटकात हार्दिक पंड्याच्या षटकातून २२ धावा घेतल्या. त्यामुळे सनरायझर्स हैदराबादला २० षटकांत पाच गडी गमावून १६२ धावा करता आल्या. हैदराबादकडून सलामीवीर अभिषेक शर्माने २८ चेंडूत सात चौकारांसह ४० धावांची सर्वाधिक धावसंख्या उभारली.
प्रथम फलंदाजी करताना अभिषेक आणि ट्रॅव्हिस हेड यांनी संघाला चांगली सुरुवात करून दिली आणि पॉवरप्लेपर्यंत मुंबईला कोणतेही यश मिळू दिले नाही आणि पहिल्या विकेटसाठी ५९ धावांची भागीदारी केली. हार्दिक पंड्याने अभिषेकला बाद करून हैदराबादला पहिला धक्का दिला. त्यानंतर हैदराबादचा डाव डळमळीत झाला. या सामन्यातही इशान किशनला चांगली कामगिरी करता आली नाही आणि तो दोन धावा करून बाद झाला. ट्रॅव्हिस हेड याला आराम मिळाला पण तो त्याचा फायदा घेऊ शकला नाही आणि २९ चेंडूत तीन चौकारांसह २८ धावा काढल्यानंतर तो बाद झाला. पहिल्याच षटकात अभिषेक व हेड या सलामी जोडीला जीवदान लाभले होते.
नितीश कुमार रेड्डीही १९ धावा काढून पॅव्हेलियनमध्ये परतला. नंतर, हेनरिक क्लासेनने आपले हात उघडले आणि संघाचा धावसंख्या १३० च्या पुढे नेला, परंतु बुमराहने त्याला बाद केले आणि पॅव्हेलियनमध्ये पाठवले. क्लासेनने २८ चेंडूत तीन चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने ३७ धावा केल्या. त्यानंतर अनिकेत वर्माने शानदार कामगिरी केली ज्यामुळे संघाचा धावसंख्या १६० ओलांडण्यात यशस्वी झाला. अनिकेत आठ चेंडूत दोन षटकारांसह १८ धावा काढून नाबाद राहिला आणि कर्णधार पॅट कमिन्स चार चेंडूत एका षटकारासह आठ धावा काढून नाबाद राहिला. मुंबईकडून विल जॅक्सने दोन, तर ट्रेंट बोल्ट, जसप्रीत बुमराह आणि हार्दिक पंड्या यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.