
प्रत्येक खेळाडूला १५० रुपयांचा भूर्दंड, पुणे बोर्डाच्या चुकीमुळे छाननी शुल्क दोनदा भरावे लागले
सोलापूर ः दहावी व बारावीच्या खेळाडू विद्यार्थ्यांचे ग्रेस गुण भरताना ‘आपले सरकार’ या ऑनलाईन प्रणालीमध्ये क्रीडा शिक्षकांना भरपूर अडचणी निर्माण झाल्या आहेत. गेल्या वर्षी जिल्हा क्रीडा कार्यालय ऑफलाइन अर्ज स्वीकारीत होते तेही विनामूल्य. तरी हे प्रस्ताव विनामूल्य व ऑफलाईनने स्वीकारावे, अशी मागणी सोलापूर शहर शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघाचे सचिव सुहास छंचुरे यांनी केली आहे.
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या परिपत्रकानुसार सन २०२४-२५ या वर्षापासून दहावी व बारावींच्या खेळाडू विद्यार्थ्यांचे ग्रेस गुणाचे अर्ज शासनाच्या ‘आपले सरकार’ या ऑनलाईन प्रणालीद्वारे स्वीकारले जात आहेत. परंतु गुण भरताना क्रीडा शिक्षकांना अनंत अडचणी येत आहेत. यामध्ये क्रीडा शिक्षक व खेळाडू यांची तारांबळ उडाली. शहर जिल्ह्यातील अंदाजे ३५०० विद्यार्थ्यांनी अर्ज सादर केले आहेत. या पोर्टलवर रुपये २३.५० ऑनलाईन शुल्क भरण्यास सांगितले. परंतु हे भरण्यासाठी ई महासेवामध्ये १०० रुपये आकारले जात आहेत.
त्यानंतर परत महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे विभागीय मंडळाने छाननी शुल्क २५ रुपये ऑनलाईनने भरण्यास सांगितले आहे. याबाबत योग्य सूचना नसल्यामुळे आणि कोणतीही कार्यशाळा झाली नसल्यामुळे काही शाळांनी ही रक्कम नेहमीप्रमाणे बोर्डाच्या खात्यात भरली. परंतु हे खाते बारावीच्या विद्यार्थ्यांचे होते. त्यामुळे दहावीच्या विद्यार्थ्यांना परत दहावीच्या खात्यात भरावे लागले. पुणे बोर्डाच्या या चुकीमुळे काही शाळांना ही रक्कम दुसऱ्यांदा भरावी लागली. त्यामुळे यासाठी संबंधित शाळांना १५० रुपये खर्च करावा लागला आहे. यापूर्वी हे गुण भरण्यासाठी १४ एप्रिलपर्यंत मुदत होती. ती नंतर १७ एप्रिलपर्यंत वाढविण्यात आली होती. भरपूर अडचणीवर मात करीत संबंधित सर्व शाळांतील क्रीडा शिक्षकांनी हे अर्ज ऑनलाईनने सादर केले आहेत.
अर्ज प्राप्त झाल्याची माहिती दिसत नाही
शेवटच्या दिवसापर्यंत सोलापूर जिल्ह्यातून किती विद्यार्थ्यांचे अर्ज आले आहेत याबाबात जिल्हा क्रीडाधिकारी नरेंद्र पवार यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, या ऑनलाईन प्रणालीत फक्त पेंडीग अर्ज किती आहेत एवढीच माहिती दिसत आहे. एकूण अर्ज किती व किती अर्ज रिजेक्ट झाले याची माहिती दिसत नाही. जिल्हा क्रीडा कार्यालयास अर्ज ॲप्रूव्ह करण्याची २१ एप्रिलपर्यंत मुदत आहे.