सुवेद पारकरचे सलग दुसरे शतक; शिवाजी पार्क वॉरियर्स गटात अव्वल

  • By admin
  • April 18, 2025
  • 0
  • 13 Views
Spread the love

 
मुंबई : सुवेद पारकर याने ज्वाला स्पोर्ट्स फाऊंडेशन आणि एमसीसी आयोजित १० व्या मित्सुई शोजी टी २० क्रिकेट लीग स्पर्धेतील सलग दुसऱ्या शतकाची नोंद केली. त्यामुळे शिवाजी पार्क वॉरियर्स संघाने घाटकोपर जेट्स विरुद्ध ३१ धावांनी विजय मिळवत सुपर लीग स्पर्धेसाठी गटात अव्वल क्रमांक पटकावला आहे. 

प्राथमिक साखळीतील शेवटच्या लढतीत शिवाजी पार्क वॉरियर्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. अगोदरच्या लढतीत तब्बल २८० धावा केलेल्या असल्याने आजही त्यांनी सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ केला. सुवेद पारकर (११८) आणि वरून लवंडे  (३४) जोडीने ४६ चेंडूंतच १०० धावांची भागीदारी रचताना ९ चौकार आणि ६ षटकारांची आतषबाजी केली. २० चेंडूत ३४ धावा करणारा लवंडे याने तीन चौकार आणि दोन षटकार ठोकले. नंतर आलेल्या डावखुऱ्या अग्नी चोप्रासह (२६) पारकरने  आणखी ७१ धावांची भर टाकली.  दरम्यान सुवेद पारकरने ५६ चेंडूत या स्पर्धेतील सलग दुसरे शतक झळकावले. ६२ धावांच्या खेळीत सुवेदने ११ चौकार आणि ८ षटकार ठोकून ११८ धावांची खेळी सजविली. जयेश पोखरे याने १० चेंडूत नाबाद ३० धावा करताना तीन चौकार आणि दोन षटकार मारले. मध्यमगती सिल्वेस्टर डिसोझा याने दोन्ही सलामीवीरांना तंबूचा रास्ता दाखविताना ५६ धावांत २ बळी मिळविले.

या आव्हानाचा पाठलाग करताना घाटकोपर जेट्स संघाचा एकही खेळाडू मोठी खेळी करू शकला नाही. रोहन गज्जर (१९), आदित्य श्रीवास्तव (१९), आकाश आनंद (१६), प्रगणेश कानपिल्लेवार (२६) यांना मोठ्या खेळी करण्यात अपयश आले. नंतर सिद्धार्थ आक्रे (४०) आणि आर्यन पटनी (३३)  यांनी थोडीफार फटकेबाजी केली  पण संघाला विजय मिळवून देण्यात मात्र ते अपयशी ठरले.  मुंबईच्या सिनियर निवडसमितीचे चेअरमन संजय पाटील या खेळाडूंचा खेळ पाहण्यासाठी एअर इंडिया ग्राऊंडवर खास उपस्थित होते. त्यांच्याच हस्ते या सामन्यातील सर्वोत्तम खेळाडू ठरलेल्या सुवेद पारकर याला गौरविण्यात आले.  संजय पाटील यांनी यावेळी उभय संघातील खेळाडूंशी संवाद साधला.

प्राथमिक साखळीतील सर्व सामन्यानंतर आता शिवाजी पार्क वॉरियर्स आणि मुंबई पोलीस सिटी रायडर्स संघांचे प्रत्येकी सहा गुण झाले असले तरी सरस नेट रन रेट मूळे शिवाजी पार्क वॉरियर्स  (०.७९२)संघाने सुपर लीग मध्ये  अव्वल स्थान पटकावले असून मुंबई पोलिस सिटी रायडर्स संघाला (०.५९४) दुसऱ्या स्थानावर राहावे लागले आहे. ठाणे मराठाज संघाने ४ गुणांसह (१.११०) तिसरा तर घाटकोपर जेट्स संघाने दोन गुणांसह (-०.५९५) चौथा क्रमांक पटकावला आहे. बांद्रा हिरोज संघाचे देखील दोन गुण होते मात्र (-१.६४५) सरस नेट रन रेटमुळे घाटकोपर जेट्स संघाला चौथा क्रमांक लाभला. प्राथमिक साखळीतील पहिले चार संघ सुपर लीग स्पर्धेसाठी पात्र ठरले असून २२ एप्रिल पासून मुंबई पोलीस जिमखाना, मारिन ड्राईव्ह येथे सुपर लीग स्पर्धेला प्रारंभ होणार आहे. सुपर लीग मधील अव्वल दोन संघांमध्ये ३० एप्रिल  रोजी पोलिस जिमखाना येथेच अंतिम सामना होणार आहे.

संक्षिप्त धावफलक ः शिवाजी पार्क वॉरियर्स ः २० षटकांत ३ बाद २३० (सुवेद पारकर ११८, वरून लवंडे ३४, अग्नी चोप्रा २६, जयेश पोखरे नाबाद ३०, सिल्वेस्टर डिसोझा ५६ धावांत २ बळी) विजयी विरुद्ध घाटकोपर जेट्स ः २० षटकांत ९ बाद १९९ (रोहन गज्जर १९, आदित्य श्रीवास्तव १९, आकाश आनंद १६, प्रगणेश कानपिल्लेवार २६, सिद्धार्थ आक्रे ४०, आर्यन पटनी ३३, सचिन गुप्ता २९ धावांत २ बळी, आश्रय सजनानी १६ धावांत २ बळी). सामनावीर ः सुवेद पारकर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *