
चार सामने प्रेक्षकांना मोठ्या स्क्रीनवर मोफत पहायला मिळणार
सोलापूर ः आयपीएलचा हंगामातील चार सामने पाहण्याचा लाभ सोलापूरकरांना मिळणार असून शनिवारी व रविवारी नेहरूनगर शासकीय मैदानावर यासाठी १८ बाय ३२ फुटांची स्क्रीन लावण्यात आली आहे.
आयपीएल फॅन पार्क सोलापुरात सातव्यांदा होत असल्याची माहिती बीसीसीआयचे प्रतिनिधी अमित सिद्धेश्वर यांनी दिली. मागील वर्षी सोलापुरात झालेल्या आयपीएल फॅन पार्क मध्ये १४ हजार प्रेक्षकांनी हजेरी लावल्यामुळे यंदा परत सोलापूरला हा मान मिळाला आहे. या फॅन पार्कमध्ये मोफत प्रवेश मिळणार आहे. या फॅन पार्कमध्ये लहान मुलांसाठी आकर्षक गेम असून फूड स्टॉल ही आहेत. प्रेक्षकातून लकी ड्रॉ काढण्यात येणार आहे. चार सामन्यातून चार टी-शर्ट लकी ड्रॉ विजेत्यास मिळणार आहेत. त्या टी-शर्ट वर आयपीएल मधील त्या खेळाडूंची सही असणार आहे.

चारही सामने प्रेक्षकांना पाहण्यास निशुल्क असून प्रेक्षकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा क्रिकेट संघटनेचे संयुक्त सचिव चंद्रकांत रेम्बर्सो यांनी केले आहे. यावेळी जिल्हा क्रिकेट संघटनेचे उपाध्यक्ष प्रकाश भुतडा, खजिनदार संतोष बडवे, अप्पू गोटे, ऋत्विक चव्हाण व सुनील मालप आदी उपस्थित होते.