
नवी दिल्ली ः फ्रेंच ओपनच्या सुरुवातीला २२ वेळा ग्रँड स्लॅम विजेता राफेल नदालचा सन्मान केला जाणार आहे. २५ मे रोजी कोर्ट फिलिप चॅटियर येथे आयोजित समारंभात नदालच्या योगदानाची दखल घेतली जाईल.
ही माहिती देताना फ्रेंच ओपनच्या संचालिका अमेली मॉरेस्मो यांनी गुरुवारी सांगितले की – राफाने फ्रेंच ओपनच्या इतिहासावर अनेक प्रकारे आपली छाप सोडली आहे, म्हणून त्यांच्या सन्मानार्थ एक समारंभ आयोजित केला जाईल.
फ्रेंच ओपनचा विक्रमी १४ वेळा विजेता नदालने गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये खेळातून निवृत्ती घेतली. क्ले कोर्ट ग्रँड स्लॅमच्या कॉरिडॉरमध्ये नदालचा पुतळा आधीच आहे. तो स्पर्धेच्या संग्रहालयात एका प्रदर्शनातही दिसणार आहे आणि फ्रेंच ओपनच्या अधिकृत ट्रेलरला आपला आवाज देईल. नदाल शेवटचा फ्रेंच ओपन २०२४ मध्ये खेळला होता पण पहिल्या फेरीत अलेक्झांडर झ्वेरेव्हकडून त्याला पराभव पत्करावा लागला.